ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय मोक्याच्या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये पथके तैनात केली आहेत. त्यानुसार गुरुवारीदेखील शहराच्या विविध भागात फेरीवाल्यांवर कारवाई केली. परंतु कारवाईच्या भीतीने आधीच फेरीवाल्यांनी पळ काढला होता.
सोमवारी पिंपळे या कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार दोन दिवसांनी कारवाईला सुरुवात करण्यात येणार होती. परंतु ती गुरुवारपासूनच सुरू झाली. प्रत्येक प्रभाग समितिनिहाय दोन शिफ्टमध्ये एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून मोक्याच्या ठिकाणी गस्त घातली जात आहे. त्यानुसार गुरुवारी कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. परंतु कारवाईच्या भीतीने मंगळवारपासूनच शहराच्या विविध भागातील फेरीवाल्यांची संख्या कमी झाली होती. गुरुवारीदेखील स्टेशन परिसर, जांभळी नाका आदींसह इतर प्रमुख भागांमध्ये फेरीवाले गायब असल्याचे दिसून आले आहे.
................
स्टेशन परिसर ते जांभळी नाका, खारकर आळी या भागात फेरीवाल्यांची संख्या अधिक प्रमाणात असते. त्यामुळे याठिकाणी तीन पथके तैनात केली आहेत. ही पथके दोन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री ११ या वेळेत सॅटीस ते गोखले रोड, गोखले रोड ते तिनहात नाका, जांभळी नाका पेढ्या मारुती, कोपरी पूर्व येथे अशी तीन पथके तयार असून त्यांच्यामार्फत कारवाई सुरू केली आहे. १५ ते २० जणांचे हे पथक कारवाई करीत असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.