अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे

By अजित मांडके | Published: May 10, 2023 05:22 PM2023-05-10T17:22:21+5:302023-05-10T17:23:22+5:30

श्रीकांत शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कोण ओळखतं, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी जोरदार समाचार घेतला.

Srikanth Shinde was in diapers when Ajitdada was first elected says Anand Paranjpe | अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे

अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे

googlenewsNext

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले की, "काकाच्या जीवावर अजितदादा मोठे झाले, त्यांना कोण ओळखतं?" पण, जेव्हा श्रीकांत शिंदे यांचा जन्म 1987 साली झाला.  त्यांच्या जन्माच्या आधीपासून अजितदादा सार्वजनिक जीवनात सक्रीय आहेत. श्रीकांत  शिंदे ज्यावेळेस  डायपरमध्ये रांगत असतील तेव्हा म्हणजे 1991 साली अजितदादा खासदार झाले होते.  तेव्हापासून त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. पण, ज्यांची स्वतःची ओळख ही खोक्यांपासून सुरू होऊन वडील, पक्षचिन्ह आणि पक्षच चोरण्याचे झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी ओळख ज्यांची आहे, त्यांनी अजितदादांशी आपली तुलना आणि दादांवर टीका करू नये,  असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले. 

श्रीकांत शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कोण ओळखतं, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी जोरदार समाचार घेतला. परांजपे म्हणाले की, राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींबाबत श्रीकांत शिंदे नेहमी एकेरीच उल्लेख करत असतात. त्यावरून  त्यांचे  संस्कार आणि संस्कृती नेहमीच दिसून येत असते. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. परंतु, अजितदादांवर टीका करताना त्यांनी तारतम्य पाळावे.

श्रीकांत शिंदे असेही म्हणालेत की,  मुख्यमंत्र्यांना सबंध देश ओळखतो. त्यांचे बरोबर आहे, एकनाथ शिंदे यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात चांगला प्रतिसाद मिळालाच होता ना? 33 देश त्यांना ओळखतात पण, ती ओळख काय आहे, हे श्रीकांत शिंदे यांनी विचार करावा. कर्नाटकात मुख्यमंत्री शिंदे यांना पहायला गर्दी होते, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तेही बरोबरच आहे. कारण, तेथील लोक बघायला येतात की महाराष्ट्रातील असा कोणता "हुशार मुख्यमंत्री"  आहे की जो महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पंतप्रधान असा उल्लेख करतो आणि एमपीएससीचा प्रश्न निवडणूक आयोगात नेतो, हे  बघायला कर्नाटकातील लोक जाहीर सभेला येत असेल.

राहिली गोष्ट राज्यातील तर मुंबई आणि खेडच्या सभेत आणलेली माणसे भाषणे ऐकायला का थांबली नाहीत, हे तथाकथित लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सांगावे. शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झालेला धनदांडग्यांच्या पचनी पडत नाही, असेही विधान त्यांनी केले आहे. पण,  महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळीच्या संकटात आहेत. त्यांचे पंचनामे झालेले नाहीत, शासकीय मदत मिळालेली नाही, ,अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी फिरत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.  उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात प्रचारासाठी फिरणाऱ्या  एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची अवस्था  " अमीत शहा आम्हाला वाचवा" असे म्हणत आहेत. 

आपली राजकीय, सामाजिक आणि वैचारिक उंची आधी तपासून घ्यावी आणि नंतर अजितदादांवर टीका करावी. अजितदादांनी आपली ओळख आपल्या कामाने निर्माण केली आहे;  कोरोना काळात अजितदादांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले होते, हे श्रीकांत शिंदे यांनी पहावे. अजितदादा हे आपल्या कर्तृत्वावर प्रसिद्ध झाले आहेत, बाप, पक्ष चोरून नाही. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून नाही, असेही आनंद परांजपे म्हणाले.

Web Title: Srikanth Shinde was in diapers when Ajitdada was first elected says Anand Paranjpe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.