ठाणे : ठाणे महापालिकेच्या १३१ नगरसेवकांसाठी ८०५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मंगळवारी एक हजार ७०४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी मतदानाच्या एव्हीएम मशिन्ससह अन्य साहित्य व कर्मचारी सोमवार दुपारपासूनच मतदान केंद्रांवर पोहोच केले जात आहेत. याकरिता, एसटी महामंडळाच्या १३० बसचा वापर करण्यात येत आहे. या बस वापरण्यासाठी ठाणे महापालिका निवडणूक विभागाने एसटीच्या विभागीय कार्यालयाशी ‘प्रासंगिक करार’ केला आहे. त्यानुसार, २० व २१ फेब्रुवारीला रात्री उशिरापर्यंत या १३० बसेस बुक केल्या आहेत. टीएमसी महापालिका शाळा क्र. १९ येथून त्या दुपारपासून ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर सोडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये व्होटिंग मशीनसह मतदान केंद्रांवर लागणारे पेन, पेन्सिल, शाई, स्टेशनरी, सांविधानिक व असांविधानिक फॉर्म्स, लखोटे, लेखन साहित्य आदी १४८ प्रकारच्या साहित्याचा यात समावेश आहे. याशिवाय, मतदान केंद्रांचे अध्यक्ष, कक्ष अधिकारी आदी कर्मचाऱ्यांना देखील नेआण करण्यासाठी या बस शहरात धावत आहेत. १२ लाख २८ हजार ५९२ मतदारांच्या मतदानासाठी सुमारे एक हजार ७०४ मतदान केंद्रांसाठी या बसेस ठाणे शहरात धावत आहेत. मतदानानंतर या बसेसद्वारे व्होटिंग मशीनही मतमोजणी केंद्रांवर पोहोचवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
मतदान साहित्यासाठी एसटीच्या १३० बसचा वापर
By admin | Published: February 21, 2017 5:52 AM