टोकावडे : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या कोरोना काळापासून बंद आहेत. अनेक गावांतील नागरिक बसफेऱ्या सुरू कराव्यात, यासाठी मुरबाड आगारात मागणी करीत आहेत. मात्र, या मागणीनंतर आश्वासनापलीकडे काहीच हाती लागत नाही. त्यामुळे मुरबाड आगारातील कारभारावर ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, यामुळे कामधंद्यावर परिणाम हाेत आहे.
अनेक जण तालुक्यातील मुरबाड औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जातात. तर तालुक्यातील भाजीपाला व्यापारीही शहरात भाजीपाला घेऊन जातात. त्यासाठी ग्रामीण भागातील बस हा महत्त्वाचा पर्याय ठरतो. मात्र, तालुक्यातील असोसे, करवेळे, विढे, ठुने-पाडाळे, कोलठण या भागातील नागरिक ग्रामीण फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करीत आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुरबाड आगाराला निवेदन दिले. मात्र या मागणीला अद्याप यश आलेले नाही.