अजित मांडके ठाणे : अनलॉकनंतर आता आंतरराज्य बससेवा सुरू झाली आहे. या सेवेला मध्यम प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सुरू करताना अत्यावश्यक सेवाही दिल्याने प्रवाशांना त्याचा फायदा झाला आहे. असे असले तरी त्यांची संख्या आजही कमी असल्याने उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
ठाण्यातील विविध भागांत रोज ४५० च्या आसपास बस या २६७ मार्गांवर धावत आहेत. पूर्वी रोज एक लाख ७६ हजार किमीचा प्रवास त्यांचा होत होता. तो आज एक लाख ५४ हजार किमीच होत आहे. पूर्वी रोज सरासरी एक लाख ६७ हजार प्रवासी लाभ घेत होते. परंतु, आता कोरोनामुळे ही संख्या एक लाख २० हजार आहे. तर, दिवसाचे पूर्वीचे उत्पन्न हे ७६ लाख होते. ते आता ४८ लाखांच्या घरात आले आहे. त्यातही लोकल पूर्णत: सुरू झालेली नसल्याने प्रवाशांची संख्या कमी असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
आंतरराज्य गाड्यांना मिळताे अल्प प्रतिसाद
- आंतरराज्य गाड्यांना सध्या मध्यम प्रतिसाद मिळत आहे. त्यातही, आता कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असल्याने प्रवाशांनी पुन्हा काही प्रमाणात एसटीकडे पाठ फिरविली आहे. तरीही, इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रवाशांची संख्या तशी फारशी कमी झालेली नाही.
- दरम्यान, ४५० बस असल्या तरी त्यातील १३० या महाराष्ट्र राज्यातील असून इतर राज्यांच्या चार आणि ठाणेअंतर्गत ३१६ बस या विविध मार्गांवर धावत आहेत. इतर राज्यांमध्ये भिवंडी ते विजापूर, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते गाणगापूर व ठाणे ते हैदराबाद या बसचा समावेश आहे.
- अनलॉकनंतर हळूहळू एसटीसेवा पूर्वपदावर येत आहे. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंतरराज्यांबरोबरच आंतरजिल्हादेखील प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. अत्यावश्यक सेवाही सुरू आहे. - विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे