अजित मांडके
ठाणे : गावदेवी भाजी मंडईच्या ठिकाणी पार्किंगची सेवा सुरू केल्यानंतर स्टेशन आणि मार्केट परिसरातील ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार, ठाणे एसटी डेपो, झेडपी कार्यालय परिसर या ठिकाणी भूमिगत, तर कळवा एसटी डेपोच्या ठिकाणीसुद्धा पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीसह पार्किंगची समस्या सुटून त्या ठिकाणी सार्वजनिक वापराच्या वास्तूसुद्धा उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.
महापालिकेने ठाणे एसटी डेपो आणि कळवा डेपोसंदर्भातील फेरबदलाचे प्रस्ताव आणि जुने ठाणे महापालिका कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, झेडपी, आरोग्य विभाग, कन्या शाळा आदींचा एकत्रित विकास करून त्या जागी नव्याने सरकारी कार्यालये, सार्वजनिक पार्किंग व्यवस्था करण्यासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव १९ नोव्हेंबरच्या महासभेत पटलावर ठेवला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत यांना तत्त्वत: मान्यता दिल्यानंतरच महापालिकेने महासभेत हे प्रस्ताव आणले आहेत.गावदेवी भाजी मंडईच्या ठिकाणी दुचाकींची पार्किंग सुविधा सुरू झाली आहे. रेल्वेच्या हद्दीतही ही सुविधा आहे. याशिवाय, गावदेवी मैदानाखाली भूमिगत पार्किंग प्लाझा सुरू करण्याची निविदा अंतिम झाली आहे. परंतु, ज्या वेगाने वाहनांची संख्या वाढत आहे, त्याच वेगाने ही समस्या जटिल होत आहे. त्यात स्टेशन परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण करणे आता शक्य नाही. दुसरीकडे कळवा हॉस्पिटल आणि परिसरातसुद्धा रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग होत आहे.आठशे वाहनांसाठी होणार वाहनतळजुने ठाणे महापालिका कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, झेडपी कार्यालय, आरोग्य विभाग, कन्या शाळा या १८ हजार चौरस मीटर परिसराचा एकत्रित विकास करून त्या जागी नव्याने कार्यालये, सार्वजनिक पार्किंग व्यवस्था भुयारी स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याठिकाणी सुमारे ८०० चारचाकी वाहने पार्क होतील, असा दावा पालिकेने केला आहे. इतर सर्व कार्यालये ही एका छताखाली आणली जाणार आहेत.
कळवा कार्यशाळेच्या जागेचा वापरकळवा एसटी डेपोच्या सुमारे ४५०० चौरस मीटर जागेतसुद्धा अशा पद्धतीने पार्किंगसह इतर सार्वजनिक वास्तू उभारण्याचा विचार पालिकेने केला आहे. याठिकाणी सध्या एसटी दुरुस्त केल्या जात आहेत. परंतु, त्या जागेला कोणत्याही स्वरूपात हात न लावता शिल्लक जागेत हा विकास केला जाणार आहे. मात्र, येथे खाडी जवळ असल्याने भूमिगत पार्किंग अशक्य असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे स्टेशन परिसरात रेल्वेस्थानकाजवळ हा डेपो आहे. परंतु, त्याचा विकास अद्यापही झालेला नाही. आता मात्र त्याच्या १७ हजार ५०० चौरस मीटर जागेवर भूमिगत स्वरूपाचे पार्किंग सेंटर उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे स्टेशन भागातील वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे. तसेच इतर सार्वजनिक स्वरूपाच्या (वाणिज्य) वास्तूंची उभारणी करण्याचासुद्धा पालिकेने विचार केला आहे. तसेच हे मॉडेल पीपीपी तत्त्वावर विकसित केले जाणार आहे.