अजित मांडके ठाणे : कोरोनाकाळात राज्यासह परराज्यातही एसटी धावत होत्या. त्यासाठी दरदिवसाला ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. त्यानुसार ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंतचा भत्ता दिला आहे; परंतु त्यानंतर डिसेंबरपर्यंत भत्ता अद्यापही त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे एसटीच्या संघटनांनी तो मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू केली होती. त्यानुसार शहराच्या विविध भागांतून या बस गुजरात, उत्तर प्रदेश आदींसह राज्याच्या इतर भागातही धावल्या होत्या. प्रवाशांना सोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये दररोजचा भत्ता दिला जाणार होता. जिवावर उदार होऊन वाहक आणि चालकांनी ही सेवा केली. अनेकांना आपल्या घरी सोडण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना हा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. यासंदर्भात एसटी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी ऑगस्टपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आल्याची माहिती दिली; परंतु त्यानंतर लॉकडाऊनमध्येही शिथिलता आली होती. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचा भत्ता दिला गेला नसल्याचे सांगितले.
कामगारांना डिसेंबरपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. त्यांनी संपूर्ण वर्षभर काम केले असल्याने त्यांना तो मिळालाच पाहिजे, अशी आमचीदेखील इच्छा आहे.- सचिन शिंदे, इंटक, ठाणे जिल्हा अध्यक्ष
आम्ही ऑगस्टपर्यंतचा भत्ता कर्मचाऱ्यांना दिलेला आहे; परंतु ऑगस्टनंतर शिथिलता आल्याने त्यांना भत्ता दिलेला नाही. शासनाने जर भत्ता देण्यास सांगितले तर तो नक्कीच देऊ. - विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक)