लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण एसटी डेपोतील कर्मचारी हा जीव तोडून काम करतो. अत्यंत कमी पगावर नोकरी टिकवून ठेवण्याच्या अपेक्षेने केलेल्या श्रमाला किंमत नाही. त्यामुळे वाहक-चालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपासून त्यांचा पगार झाला नव्हता. यामुळे खायचे काय. घर खर्च आणि मुलांचे ऑनलाईन शिक्षण, शालेय फी, वैद्यकीय खर्च कसा काय भागवायचा असा प्रश्न त्यांना पडला होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य परिवहन महामंडळास ५०० कोटी रुपये दिल्याने थकलेले दोन महिन्याचे वेतन सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यात दिले. त्यामुळे त्यांना गणपतीचा सण साजरा करण्यास मदत झाली, जणू बाप्पा पावला.
गणपतीनंतर दिवाळीत अशा प्रकारे वेळेवर पगार व्हावा, अशी आपेक्षा कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्हा हा एसटी प्रवासी भारमानासाठी प्रथम आहे. त्यातही कल्याण एसटी डेपोचे भारमान जास्त चांगले आहे. डेपोतून उत्पन्न चांगले मिळत असेल तर कर्मचा-यांचा पगार वेळेवर व्हायला हवा, वैद्यकीय बिले पूर्ण दिली गेली पाहिजेत. अन्य लाभही दिल्यास कर्मचारी आणखीन जोमाने काम करून उत्पन्नात भर घालू शकतात.
--------------------------------------
पगार दोन महिन्यांतून एकाच वेळी झाला
एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाच्या कर्मचा-यांनी त्यांची थकीत देणी आणि वेतनवाढीसाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यालाही तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला.
-तरीदेखील कामगारांचे पगार वेळेत होत नाही. कोरोना काळात किमान वेळेत पगार होणे अपेक्षित होते. अनेक डेपोंची वाहतूक ठप्प होती. हे कारण दिले गेले.
- ठाणे रिजनमधील कल्याण डेपोची वाहतूक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गासाठी खुली होती. किमान या डेपोतील कर्मचारी वर्गाच्या पगार वेळेत दिला गेला पाहिजे होता, अशी अपेक्षा येथे काम करणा-यांकडून व्यक्त केली जात आहे.
--------------------------------------
वैद्यकीय बिले अर्धीच मिळतात
डेपोत काम करणा-या वाहचचालक आणि कर्मचारी यांनी वैद्यकीय बिले प्रशासनाकडे सादर केली आहे. त्यांचे बिल समजा एकूण १५ हजार रुपयांचे असल्यास त्यांच्या हातावर केवळ सात हजार रुपयेच टेकवले जातात. ही वस्तूस्थिती लेखाअधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर मान्य केली आहे.
अर्धेच बिल मंजूर केले असल्याने उर्वरीत बिलाची रक्कम त्यांनी कुठून आणायची असा प्रश्न आहे. त्याची भरपाई कोण करणार हा प्रश्न चालक-वाहक आणि कर्मचारी वर्गाला भेडसावत आहे.
--------------------------------------
उपचारावर झालेला खर्च कुठून आणायचा
कोरोना काळात अनेक चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या मुलामुलीना आईवडिलांनाही कोरोना झाला. पहिल्या आणि दुस-या लाटेच्या वेळी सरकारी रुग्णालयात जागाच नव्हती. त्यामुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. हा खर्च जास्तीचा होता. त्यांनी उपचारावर झालेला खर्च कुठून आणायचा असा प्रश्न आहे. त्यात आणखीन आता तिस-या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-महादेव म्हस्के
--------------------------------------
कल्याण बस डेपो
वाहक-९०
चालक-६४
चालक आणि वाहक दोन्ही कामे करणारे-१२५
कर्मचारी अधिकारी अधिकारी-७५
--------------------------------------