कल्याण : फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घ्यावीत, या मागणीसाठी पालकांचा महिनाभरापासून सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. निवेदने, ठिय्या, साखळी उपोषण, टाळेठोक आणि बेमुदत आंदोलनाची दखल शाळा व्यवस्थापन घेत नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवक महेश गायकवाड व पालकांनी गुरुवारी मुंडण आंदोलन करत रोष व्यक्त केला.पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील सेंट मेरी शाळेने फीवाढ केली आहे. राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्र माव्यतिरिक्त पुस्तके लादली आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने ते मागे घ्यावे, अशी मागणी करत पालकांनी आंदोलने केली. तसेच शाळेसमोर बुधवारी बेमुदत उपोषण केले. दुसरीकडे शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या मंडळाच्याअभ्यासक्र माचीच पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावीत. अन्य मंडळांच्याअभ्यासक्र माची सक्ती विद्यार्थ्यांवर नको, असे आदेश शाळेला दिले होते. त्यानंतरही व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पुस्तके न घेतलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करत शिक्षा केल्याचा आरोप पालकांनी करून पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पालकांच्या या आरोपांचे व्यवस्थापनाने खंडण केले आहे.विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीलाशाळा व्यवस्थापन आणि पालक आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. सातत्याने आंदोलने सुरू आहेत. शाळा व्यवस्थापनाकडून कार्यवाही होत नसल्याने गुरुवारी नगरसेवक महेश गायकवाड, पालक संघटनेने मुंडण आंदोलन करत शाळा व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून याप्रश्नी मध्यस्थी करत मार्ग काढावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
सेंट मेरी शाळेचा निषेध : नगरसेवक, पालकांनी केले मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:12 AM