वाडा : वाडा-मलवाडा रस्त्यावरील मलवाडा फाटा येथे शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजता चिंचपाडा-वाडा एस. टी. बसची एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४७ विद्यार्थी व ८ प्रवासी जखमी झाले. जखमींतील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह ६३ प्रवासी होते.
तेजू घाटाळ (१७) या विद्यार्थिनीच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी ठाणे येथे, तर चालक शंकर सोनकांबळे याला उपचारासाठी कल्याणी रुग्णालयात दाखल केले आहे. तालुक्यातील चिंचपाडा येथून सकाळी सव्वासहा वाजता ही बस वाड्याच्या दिशेने येत होती. या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य ७ प्रवासी या बसमध्ये होते. वाड्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देसई नाका येथील वळणावर हा अपघात झाला. अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडाला, दातांना व डोक्यावर जबर मार लागला आहे. सुदैवाने या अपघातात गंभीर जखमी कुणीही झाले नाही.
दोन शाळांचे ५६ विद्यार्थी बसमध्येवाडा येथील पी. जे. हायस्कूल व स्वामी विवेकानंद या दोन्ही माध्यमिक शाळांची वेळ सकाळीच असल्याने चिंचपाडा, पीक, शिलोत्तर, देवळी, मानिवली या परिसरातील ५६ शालेय विद्यार्थी या बसमधून प्रवास करीत हाेते.
अपघाताची माहिती मिळताच, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके व एस.टी. महामंडळाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी विलास राठोड यांनी भेटी देऊन जखमींची विचारपूस केली व संबंधित विभागांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.