लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : सुमारे तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागातील शहापूर येथील नवीन बसपोर्टलच्या रखडलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर आगाराला भेट दिली. तर शहापूर नवीन बस पोर्टचे काम युद्धपातळीवर सुरू करणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी शहापूर येथे भूमिपूजन झालेल्या बसपोर्टलचे काम कासवगतीने सुरू होऊन आता पूर्णतः रखडले आहे. १९७८ साली बांधकाम झालेल्या बस आगाराची इमारत आता जीर्ण झाली आहे. छप्पर मोडकळीस आले आहे. बसस्थानकात दुर्गंधी, खराब झालेल्या ड्रेनेज यंत्रणा, परिसरात साफसफाई नसणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, अशा अनेक सुविधांचा अभाव आहे. तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांनी सन २०१५ मध्ये विधान सभेत प्रश्न उपस्थित करून बसपोर्टलला मंजुरी मिळवली होती. बस आगारात ११ फलाट असलेले एक मजली बांधकाम होणार आहे. यामध्ये चालकवाहक यांच्यासाठी स्वतंत्र निवास गृह, अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र कार्यालये, व्यापारी गाळे, रिक्षा स्टँड, पार्किंग व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध होणार आहे. तीन वर्षांपासून या पोर्टचे काम रखडले होते, म्हणून माजी आमदार बरोरा यांनी बसपोर्टचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत टाका अशी मागणी केली होती.
त्या नंतर हे बसपोर्टलचे काम महिनाभरात सुरू नाही केल्यास आंदोलनाचा इशारा आमदार दौलत दरोडा यांनी दिला होता. तरी रखडलेल्या कामामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोकादायक बनलेल्या शहापूर बसआगाराच्या पोर्टलची पाहणी केली आणि काम युद्धपातळीवर सुरू करणार असल्याचे सांगितले. यावेळी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, उपजिल्हा प्रमुख शंखर खाडे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर, प्रांताधिकारी मोहन नळदकर, तहसीलदार निलिमा सूर्यवंशी,ठाणे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव, आगार प्रमुख सतीश वाणी उपस्थित होते.