ठाणे : सध्या स्थायी समिती म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधारी किंवा प्रशासनाविरोधात बोलणारे व्यासपीठ ठरल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केला. लसीकरणाच्या मुद्द्यावरून स्थायी समितीत महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादीसह विरोधी बाकावरील भाजपनेदेखील सत्ताधारी आणि प्रशासनावर आरोप केला होता. त्यावर महापौरांनी पलटवार करीत स्थायी समितीचेच कान टोचले आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह भाजपचे कृष्णा पाटील आणि भरत चव्हाण यांनी लस वाटपात राजकारण केले जात असल्याचा आरोप केला होता. केवळ मर्जीतील नगरसेवकांनाच लस दिली जात असून इतर नगरसेवकांना डावलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावरून महापौरांना छेडले असता, त्यांनी स्थायी समिती सध्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणारे व्यासपीठ झाल्याचा आरोप केला आहे. लस उपलब्ध होत नाही, त्यात खासगी रुग्णालयांना लस मिळते, यात महापालिकेची काय चूक आहे? असा सवालही त्यांनी केला. महापालिकेने लस खरेदी करण्याची तयारी ठेवली होती. परंतु केंद्राने निर्णय बदलल्याने राज्यांना लस खरेदी करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याने राज्याला आणि त्यामुळेच महापालिकेला लस उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही खासगी रुग्णालयांना २५ टक्के लस देण्याचा अधिकार केंद्राने स्वत:कडे घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना लस केंद्राकडून उपलब्ध होत आहे. त्याचे खापर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर फोडणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.
स्थायी समितीत चर्चा काय करावी, यालासुद्धा महत्त्व आहे. केवळ टीका करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीत शिवसेनेचे सदस्य असले तरीदेखील त्यात अंतर्गत राजकारणाचा विषय नाही. बऱ्याचशा मुद्द्यांवर मलासुद्धा उत्तर देता येते. परंतु आपण पक्षाशी बांधली आहोत. महापौर असलो तरी मी जिल्हा प्रमुखदेखील आहे, याचे स्मरण करून देत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यावरही टीका केली.