ठाणे : स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पध्दतीने निवड करुन सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला असल्याचा आरोप चुकीचा असून आम्ही नियमानुसारच स्थायी समितीचे गठण केले असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेने केला आहे. त्यामुळे या संदर्भातील मंजुर झालेला प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी दाखल केला जाईल आणि लवकरच स्थायी समितीचे गठण होईल असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पध्दतीने निवड करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. परंतु त्यांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सत्ताधारी शिवसेनेचे म्हणने आहे. महानगरपालिका कायदयात स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडणूकीत ज्या पक्षाचे जेवढे सदस्य निवृत्त होतात तेवढेच सदस्य पुन्हा नामनिर्देशित होतात. शिवसेना आणि मित्र पक्षाचे ९ सदस्य सदरच्या स्थायी समितीत होते त्यामुळे ते सदस्य निवृत्त झाल्यानंतर पून्हा तेवढेच सदस्य नामनिर्देशित होणे नियमानेच असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. स्थायी समितीच्या गठनाबाबत दोन याचिका नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. त्या दोन्ही याचिका त्यांनी बिनशर्त मागे घेतल्या व त्या दोन्ही याचिकामध्ये न्यायालयाने स्थायी समिती गठनाबाबत किंवा नविन सदस्याच्या नियुक्तीबाबत कोणतेही भाष्य केले नाही, किंवा आदेश दिलेले नाहीत. शिवाय कॉग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांचे दोन गट बनविणे आणि त्यांच्या पक्षाला वेगळी मान्यता देऊन दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या गटात समाविष्ट करणे व १ नगरसेवक काँग्रेस पक्ष म्हणून ठेवणे हे कोणत्या नियमात बसते असा सवालही सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे आम्ही नियमानुसार स्थायी समिती गठीत केली असून प्रस्ताव प्रशासनाला सादर करणार नाही, असा आरोप करणेही चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणने आहे.
आम्ही नियानुसार स्थायी समितीचे गठण केले असून त्या संदर्भातील ठराव आजच प्रशासनाकडे सादर केला आहे. यापूर्वी सुध्दा विरोधकांनी असे चुकीचे आरोप केले होते. परंतु त्यातून काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे उगाचच त्यांनी राईचा पर्वत करु नये.(नरेश म्हस्के - सभागृह नेते, ठामपा)