सुरेश लोखंडे/ठाणे
ठाणे : येथील रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही.रेल्वे प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने त्यांचे गावदेवी परिसरातील तीन वाहनतळ ठाणेकर वाहनचालकांना तातडीने उपलब्ध करुन देत वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या दूर करावी,अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. ठाणेकर घर ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर करतात पण स्टेशन परिसरात पुरेशी जागा नाही. तसेच स्टेशन जवळील मुख्य बाजारपेठेत चार चाकी वाहन घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या वाहनांना पार्किंगसाठी कुठेही जागा नाही.पार्किंग अभावी नागरिकांना टोविंग व्हॅन,नो पार्किंगच्या दंडाचा भुर्दंड पडत आहे. याकडे लक्ष केंद्रीत करुन काँग्रेसने या ठाणेकरांच्या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधले. ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात गावदेवी परिसरात एकूण तीन वाहनतळ आहे. त्यामुळे गावदेवी मार्केट, गावदेवी मैदान,कुस्तीगीर भवन इमारतीच्या बाजूला असलेला वाहनतळ आदी तीन्ह वाहनतळे बंद न ठेवता ती तातडीने सुरू करुन पार्किंग समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने महापालिकेला धारेवर धरले आहे. वाहन तळ बंद ठेवणे हे महानगरपालिकेचे पार्किंग धोरण आहे का.? असा सवालही शेवाळे यांनी विचारला आहे. स्टेशन परिसरातील ठाणेकरांची पार्किंगची होणारी गैरसोय तातडीने दूर करा. येथील तीन्ह वाहनतळ खुले करण्याचा निर्णय तातडीने दहा दिवसात घेण्यात यावा, अशी मागणी राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कडे केली आहे. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशाराही दिला आहे.