मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांत इंग्रजी व सेमी इंग्रजी पद्धतीचे शिक्षण सुरू करा, अशी सूचना बुधवारी झालेल्या महासभेत भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी केली.पाटील यांनी पालिकेच्या मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळांतील पटसंख्या कमी होत असून शाळा कमी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यावर प्रशासनाने भर देण्याची गरज निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. मातृभाषा जितकी आवश्यक आहे, तितकीच इंग्रजी भाषेचीही आवश्यकता आहे.पालकांचा कल खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे झुकत असल्याने सामान्य पालकही आपल्या मुलाला ऐपत नसतानाही खाजगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतात. यामुळे पालिकेच्या मराठी, हिंदी या विविध माध्यमांतील शाळांतील पटसंख्या कमी होऊ लागली आहे.ही संख्या कमी होऊ न देता विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सेमी इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. तर, इयत्ता पाचवीपासून काही शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षण सुरू करणे काळाजी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याउलट सध्या पालिका शाळांची परिस्थिती असल्याने शाळांतील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. परिणामी, शाळा बंद न करता त्यातील विद्यार्थ्यांचा खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पालिका शाळांतील शिक्षण पद्धतीचा व त्यातील विद्यार्थ्यांचा दर्जा वाढवणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना मातृभाषेसह इंग्रजीचे शिक्षण दिले जावे, अशी सूचना त्यांनीकेली.विद्यार्थ्यांना पालिका शाळांतील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी खाजगी शाळांत प्रवेश घेताना इंग्रजी माध्यमातील शिक्षण पद्धतीचा अडसर होतो. यामुळे पालिका शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी शिक्षण पद्धतीचे पुरेसे प्रशिक्षण द्यावे. नामवंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. मोठमोठ्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पालिकेच्या शाळा दत्तक द्याव्यात, आदी सूचना केल्या.उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी पाटील यांनी केलेल्या सूचनांवर विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली. परंतु, पालिका शाळांतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी पद्धतीचे शिक्षण दिले जात असून पुढील शैक्षणिक वर्षानुसार त्या पद्धतीचे शिक्षण वरच्या वर्गात सुरू केले जात असल्याचे सांगण्यात आले.पालिकेऐवजी खासगी शाळांची माहितीप्रभात पाटील यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाकडे फेब्रुवारीमध्ये पालिका शाळांचीच माहिती मागितली होती. ती तब्बल दोन महिन्यांनी दिली. मात्र, त्यात पालिका शाळांऐवजी खाजगी शाळांचीच माहिती देण्यात आल्याचे आयुक्त व महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. त्यातच, दिलेली माहिती इंग्रजी भाषेत असल्याने त्यावर त्यांनी आक्षेप घेत पालिका कारभारात मराठी भाषेचा आग्रह धरला जात असताना शिक्षण विभागाने इंग्रजीत माहिती देणे अयोग्य असल्याचे मत मांडले.
पालिका शाळेत इंग्रजी, सेमी इंग्रजी सुरू करा! प्रभात पाटील यांची महासभेत सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:42 AM