स्टार १०९२
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पॅसेंजर रेल्वे एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो; परंतु कोविडकाळात देशभरात केवळ विशेष गाड्या सुरू आहेत. त्यात मुंबईहून सुटणाऱ्या अथवा येणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. जसे आदेश येतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, पॅसेंजर गाड्या तोट्यात असल्या तरी तात्काळ सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
कोरोनामुळे दीड वर्षापासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. मध्यंतरी एलटीटी-साईनगर शिर्डी गाडी सुरू करण्यात आली होती. मात्र, कडक निर्बंध आणि राज्यातील मंदिरे बंद असल्याने त्या गाडीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही दिवसांत ही पॅसेंजर बंद केली. मात्र, आता अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे एलीटीटी-साईनगर शिर्डी, मुंबई-भुसावळ या पॅसेंजर तातडीने सुरू कराव्यात. तसेच त्यांना पूर्वीप्रमाणे थांबा द्यावा, अशी मागणी होत आहे. आधीच कोरोनामुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गाड्या सुरू झाल्यास गोरगरिबांना कमी पैशात आपल्या गावी जाता येईल, याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी गणेशोत्सवाला जाता यावे, यासाठी दादर-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. शिवाय लोकप्रतिनिधीही याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र देत आवाहन करत आहेत.
--------------------
जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर
दिवा-सावंतवाडी बंद
दादर-रत्नागिरी बंद
मुंबई-भुसावळ बंद
एलटीटी-साईनगर शिर्डी बंद
--------------------
पॅसेंजर गाड्यांचे तिकीट हे अन्य गाड्यांच्या तुलनेने कमी असते. केवळ तिकिटांचा प्रश्न नसतो, त्या गाड्या सगळ्या स्थानकांत थांबतात. त्यामुळे एक्स्प्रेसला जादा भाडे देऊन अपेक्षित थांबा मिळाला नाही की, पुन्हा लांबून अपेक्षित ठिकाणी जायला वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे सर्व पॅसेंजर ट्रेन तात्काळ सुरू व्हायला हव्यात.
- मनोहर शेलार, वांगणी.
--------------