सदानंद नाईक
उल्हासनगर : दुरावस्था झालेल्या रस्त्यातील खड्डे भरण्याला सुरवात झाली असून आमदार कुमार आयलानी, महापौर लिलाबाई अशान यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी १७ कोटींची तरतूद करण्यात आली.
उल्हासनगर महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्या पूर्वी न केल्याने, संततधार पावसाने शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले होते. तसेच लहान मोठे अपघात झाल्याने, सर्वस्तरातून महापालिकेवर टीका सुरू झाली. मात्र संततधार पावसात डांबरीकरण करता येत नसल्याने, महापालिका प्रशासनाचाही रस्ता दुरुस्ती बाबत नाईलाज झाला होता. सुरवातीला रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी साडे सहा कोटीच्या निधीची तरतूद केली होती. त्यानंतर यामध्ये १० कोटीची भर टाकून एकून १७ कोटीच्या निधीतून रस्ता दुरुस्तीची कामे सोमवार पासून सुरू झाली. रस्त्यातील खड्डे भरण्याचा शुभारंभ कार्यक्रम महापौर लिलाबाई अशान, आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाली आहे.
शहरातील नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, संभाजी चौक ते पाच दुकान रस्ता, गुरुनानक शाळा रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, फॉरवर्ड लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय रस्ता, खेमानी रस्ता, डॉल्फिन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, काली माता मंदिर चौक रस्ता ते कैलास कॉलनी रस्ता आदी रस्त्याची दुरावस्था झाली असून नवरात्रौत्सव पूर्वी रस्त्याची दुरुस्ती कारण्याची मागणी होत आहे. रस्त्यातील खड्डे भरण्याच्या शुभारंभ कार्यक्रमात महापौर लिलाबाई अशान, आमदार कुमार आयलानी, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, नगरसेवक अरुण अशान, राजेश वाधारीया, महेश सुखरमनी, शहर अभियंता महेश शितलानी यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.