अनिरु द्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणू तालुक्यातील काही भागात भात लावणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्यातील हंगामात पावसाची साथ लाभत असून मजुरांची उपलब्धता सहज होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्या काळात भात पेरणी केलेली रोपे पंचवीस पेक्षा अधिक दिवसांची झाली आहेत. २१ दिवसानंतरची रोपं लावणी योग्य असतात. शिवाय बागायती शेतकऱ्यांकडून धूळपेरणी केली जात असल्याने दरवर्षी पहिल्या टप्यातील लावणीचा प्रारंभ हे शेतकरी करतात. दरम्यान जून महिन्यात नेहमी प्रमाणे सततचा आठवडाभर पडणारा पाऊस न झाल्याने तालुक्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. या काळात दिवसातील काही वेळ पाऊस उघडीपही देत होता, त्यामुळे भात रोपांच्या वाढीला अनुकूल वातावरण मिळाल्याने काही भागात लावणीला प्रारंभ झाला आहे अशा ठिकाणी चिखलणीसाठी पॉवरटिलर आणि लावणीकरिता मजुरांची सहज उपलब्धता होत आहे. मात्र पुढील आठवड्यात निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर लावणीला सुरुवात होणार असल्याने स्पर्धा दिसून येईल. साधारणत: तालुक्यात तीन टप्यात लावणी केली जाते सुरुवातीच्या टप्प्याला प्रारंभ झाला असून नागपंचमी ते गोपाळकाल्यापर्यंत दुसरा टप्पा आणि त्यानंतर शेवटच्या टप्यात पाणथळ शेत जमीनीवरची लावणी केली जाते. डहाणू तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या भाताच्या वाणांचे वाटप करण्यात आले होते. शिवाय तालुका कृषी विभागामार्फत उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळात राबवून ७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. डहाणू तालुक्यातील भात लागवडीखालील क्षेत्र १५ हजारहेक्टर क्षेत्र आहे. ४ जून रोजी भात पेरणी केली असल्याने दोन दिवसांपूर्वी लावणीला प्रारंभ केला आहे. योग्य पाऊस तसेच लावणीचा पहिला टप्पा असल्याने मजूर आणि चिखलणी यंत्राची उपलब्धता झाली आहे. -विजय गोविंद किणी, चिखले गावातील भात उत्पादक शेतकरी
पहिल्या टप्प्यातील भात लावणी हंगामाला प्रारंभ
By admin | Published: July 02, 2017 5:32 AM