कल्याण : जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.श्लॉ वॉटर बोटीतून ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाचे सल्लागार व नौसेनेचे निवृत्त कॅप्टन रोहिला, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. हा मार्ग कल्याण खाडीपासून डोंबिवली, दिवा, मुंब्रा, अंजूर दिवे, गायमुख ते वसई असा राहणार आहे. या मार्गात १० स्टेशन असून, ती मेट्रो रेल्वे स्थानकाप्रमाणे बांधली जातील. त्यासाठी जेटी विकसित केल्या जाणार आहेत. पाहणी दौºयात वसई ते कल्याण अंतर पार करण्यासाठी एक तास २० मिनिटे लागली. एका वेळी एका बोटीतून ७० ते ८० प्रवासी प्रवास करतील. वसई ते कल्याण, कल्याण ते वसई अशा बोटीच्या फेºया होतील. ठाकुर्ली येथील चोळे पॉवर हाउस ते कल्याण यादरम्यान खाडीत खडक असून, तो फोडावा लागणार आहे.सध्या कल्याणहून वसईला जाण्यासाठी एसटीच्या कल्याण-आंबाडी-वसई-विरार या मार्गाने धावणाºया बस आहेत. त्या किमान तीन तासाने आहेत. ठाण्याहून वसईला जाण्यासाठी ठाणे-दादर-वसई, असा हेलपाटा मारून जावे लागते. तर रेल्वेने वसई गाठण्यासाठी दिवा-वसई गाडी कोपर स्थानकातून पकडावी लागते. परंतु, या मार्गावर दररोज किमान सहाच गाड्या धावतात. या प्रवासाला एक ते सव्वा तास लागतो. रेल्वेचा आणखी एक पर्याय म्हणजे दादरमार्गे वसई-विरार गाठणे. पण हा सर्वात जास्त लांबचा पल्ला आहे. त्या तुलनेत जलवाहतुकीमुळे वसई गाठण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.जलवाहतुकीसाठी ठाणे पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार कल्याण ते ठाणे, ठाणे ते वसई, ठाणे ते नवी मुंबई, ठाणे ते मुंबई या जलमार्गांच्या शक्यता त्यात नमूद केल्या होत्या. त्यासाठी सल्लागाराने निश्चित केलेल्या जलमार्गाची पाहणी शिंदे यांनी केली. हा जलमार्ग अंतिम झाल्यावर त्याचा अहवाल पुन्हा सादर करून कामाची निविदा काढली जाणार आहे.
कल्याण-वसई जलमार्गाला चालना, खासदारांकडून पाहणी : मेट्रोच्या धर्तीवर उभारणार १० स्थानके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:17 AM