मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांना आता घरीच उपचारासाठी ठेवले जात आहे. त्यातच भाईंदरचे भीमसेन जोशी रुग्णालय कोविड १९ साठी केल्याने गोरगरिबांना अन्य आजारांच्या उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या रुग्णालयात गोरगरिबांसाठी अन्य उपचार सेवा सुरू करावी, अशी मागणी रुग्णालयाच्या नियामक समितीचे सदस्य ओमप्रकाश अग्रवाल यांनी केली आहे.
गेल्या वर्षी कोरोना संसर्ग फोफावू लागल्यावर जोशी रुग्णालयास महापालिकेने कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले. २०० खाटांच्या या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविडमुळे या ठिकाणी प्राथमिक उपचार, प्रसूती आणि सामान्य आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांची मात्र उपचाराअभावी गैरसोय होत आहे. दुर्बल घटकातील नागरिकांना खाजगी ठिकाणी उपचार घेणे परवडत नाही. शिवाय कोरोना रुग्णांना आता घरीच ठेवले जात असल्याने जोशी रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक, आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी एकत्रित पाहणी करून आढावा घ्यावा. त्या अनुषंगाने सरकारकडे अहवाल पाठवावा, असे निवेदन अग्रवाल यांनी आयुक्तांसह संबंधितांना दिले आहे.