- अनिकेत घमंडी डोंबिवली - सध्या ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे - नेरूळ दरम्यान लोकल चालवल्या जातात, ह्याच सर्व ठाणे - नेरूळ लोकलचा पुढे उरण पर्यंत विस्तार होण्याची आवश्यकता आहे.शुक्रवारी १२ जानेवारी ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उरण पर्यंत तयार केलेल्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार असून सध्या नेरूळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या लोकल फेऱ्या उरण पर्यंत विस्तारीत केल्या जाणार आहेत. त्यावेळी या पर्यायाचा विचार करून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी रेल्वेकडे केली.
गेल्या तीन वर्षांपासून केवळ नेरूळ/बेलापूर ते खारकोपर एवढ्या लहान अंतरात व तीन स्टेशन दरम्यान लोकल फेऱ्या चालवल्या जात असल्यामुळे ह्या लोकल फेऱ्यांचा मुंबईच्या इतर उपनगरीय रेल्वे मार्गावर विस्तार करणे व्यवहार्य नव्हते.
परंतु आता थेट उरण पर्यत म्हणजे नेरूळ / बेलापूर हून पुढे तमघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी एवढ्या आठ व त्यातही न्हावाशेवा सारख्या महत्त्वाच्या स्टेशनातून उरण लोकलचा प्रवास होणार असल्याने, महामुंबईच्या इतर भागातून थेट उरण पर्यंत प्रवास करायला लोकल सेवा सुरू होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
विक्रोळी पासून बदलापूर व आसनगाव पर्यतची मुंबईची पूर्व उपनगरे, पश्र्चिम रेल्वे वरील मिरा-भाईंदर वसई-विरार भिवंडी इ. महापालिकांच्या शहरी बसेस व्दारे ठाणे स्टेशनला येवून तसेच ट्रान्सहार्बर वरील दिघा ते तुर्भे दरम्यान च्या नवी मुंबईतील उपनगरांतून दररोज शेकडो कर्मचारी न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट व अन्य बंदरांच्या परीसरात नोकरी/व्यवसायाच्या निमीत्त जा-ये करत असतात. एवढी वर्ष ह्यां प्रवाशांना लोकल व पुढे बस/रीक्षा असा प्रवास करावा लागत असे. तसेच लवकरच कार्यान्वित होणाऱ्या नवी मुंबईच्या विमानतळावर जा-ये करायला तमघर हे जवळचे स्टेशन आहे. ह्यामुळे आता ह्या प्रवाशांच्या सोईसाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून, ठाणे ते उरण पर्यंत थेट लोकल सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ह्या प्रवाशांना ठाणे व नेरूळ ह्या दोन स्टेशनात लोकल बदलाव्या लागतील असे त्यांनी सांगितले.