लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठामपाने १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली होती. या कालावधीत अनेक नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असून, त्यांचा दुसऱ्या डोससाठीचा २८ दिवसांचा विहित कालावधी उलटून गेला आहे. यासाठी १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू करावे, असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे सिव्हिल रुग्णालयानेही १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मनपानेही या वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू करावे. १८ ते ४४ या वयोगटांतील बहुतांश नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असून आयसीएमआरच्या नियमानुसार त्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. सध्या ठाण्यात १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू नसल्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, दुसरा डोस मिळेल की नाही, याबाबत भीतीचे वातावरण आहे. तसेच लसीकरण कधी सुरू होणार, याबाबत सातत्याने नागरिक विचारणा करीत आहेत. त्यामुळे या वयोगटांतील नागरिकांना दुसरा डोस दिल्यास त्यांच्यातील संभ्रम दूर होईल व लसीकरणाचे उद्दिष्टही पूर्ण होण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करून मनपाने या वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू करावे, असे लेखी निर्देश म्हस्के यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहेत.
-------------