डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक नृत्य व पारंपारिक गीतगायन स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. आनंद दिघे सभागृहात या स्पर्धेची आज प्राथमिक फेरी पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, माजी सभापती दिपाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेत सोलो आणि गुरप या दोन्हीत १५० जण सहभागी झाले आहेत. कल्याण विभागाची प्राथमिक फेरी बुधवारी आचार्य अत्रे सभागृहात पार पडणार आहे. रेखा चौधरी म्हणाल्या, तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. येत्या वर्षात अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून गीतगायन आणि नृत्य स्पर्धेच्या पारितोषिकात बदल करून उत्तेजनार्थ पारितोषिक वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सांगितले.या स्पर्धेत सादरीकरण गटात प्रथम पारितोषिक १५ हजार रु., द्वितीय पारितोषिक १० हजार रु., तृतीय पारितोषिक ७ हजार रु., उत्तेजनार्थ तीन हजार रु. देण्यात येणार आहे. लक्षवेधी वेशभूषा या गटात प्रथम पारितोषिक तीन हजार रु. , द्वितीय पारितोषिक दोन हजार रु.,तृतीय पारितोषिक एक हजार रु. देण्यात येणार आहे. तर लक्षवेधी नृत्य आणि गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक तीन हजार रु., द्वितीय पारितोषिक दोन हजार रु., तृतीय पारितोषिक एक हजार रु. देण्यात येणार आहे.