अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात कशा प्रकारे घोळ केला जातो, ते मंगळवारी पुन्हा एकदा उघड झाले. विकास कामांच्या विषयांना स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ती यादी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आली होती; मात्र तत्पूर्वी राजकीय दबंगगिरीने यादीमध्ये परस्पर विषय टाकून ती मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात आली होती. अर्थसंकल्पाच्या सभेत हा घोळ उघड झाला.स्थायीने मंजुर केलेला अर्थसंकल्प आहे त्या स्थितीत पालिका सभागृहासमोर सादर करणे अभिप्रेत होते; मात्र तत्पूर्वी एका बड्या लोकप्रतिनिधीने विकास कामांच्या यादीमधील ५३ क्रमांकाचा विषय परस्पर बदलला. राजकीय दबावाला बळी पडून अधिकाऱ्यांनीदेखील मंजुर झालेला विषय काढून, त्याऐवजी नवीन विषय समाविष्ट केला. नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी यावर सभागृहात अधिकाºयांना धारेवर धरले. अर्थसंकल्पातील विकास कामांच्या यादीत परस्पर बदल केलाच कसा, असा जाब त्यांनी अधिकाºयांना विचारला. त्यावेळी संबंधित अधिकाºयाने उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी हे बदल करण्यास सांगितले. शेख यांचे नाव पुढे येताच शिवसेनेच्याच नगरसेवकांमध्ये जुंपली. अब्दुल शेख यांनी या विषयाला अनुसरुन त्यांचे स्पष्टीकरण दिले. हा विषय समाज मंदिराचा असून, त्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मात्र यावरून वादळी चर्चा रंगली. अखेर हा विषय यादीतून काढण्याचा निर्णय देत नगराध्यक्षांनी सभा गुंडाळली.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात राजकीय दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:33 AM