ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडीतील कुंदाफाटा येथे छापा टाकून बनावट विदेश मद्यासह १२ लाख दहा हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी हस्तगत केला. याप्रकरणी राजेश ठाकूर याच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कुंदाफाटा येथे बनावट मद्य निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, ठाणे, कोकण विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण आणि अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे, दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील आणि अनिल राठोड आदींच्या पथकाने खासगी वाहनाने भिवंडी तालुक्यातील कुंदाफाटा येथील पत्राशेड, नदी जवळ नबावट मद्य निर्मिती केंद्रावर २३ जुलै २०१९ रोजी छापा टाकला. यावेळी राजेश ठाकुर हा बनावट मद्य आणि मद्य तयार करण्यासाठी लागणाºया मद्याच्या रिकाम्या बाटल्या, बुचे आणि लेबल्स अशा सहा लाख ४७ हजार ४८० रुपयांच्या मुद्देमालासह तिथे आढळून आला. त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याच चौकशीतून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते कॉलेजजवळ पालसई येथे एका घरातून कुणाल काशिद यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बनावट विदेशी मद्याचे पाच बॉक्स असलेली कारसह पाच लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर काशीद यालाही अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईमध्ये सुमारे १२ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांनाही अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.