ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे आणि भिवंडी पथकाने मोठी देसाई तसेच भिवंडीत धाडसत्र राबवून गावठी दारुसह दोन लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांच्या आदेशाने भिवंडीचे प्रभारी अधिकारी बी. आर. पाटील, उपनिरीक्षक ए. एस. चव्हाण यांच्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी दादरा नगर हवेली येथील हॉटेल व्यवस्थापक सुंदन दाजी बोंड याला बेकायदेशीर विदेशी मद्य विक्री प्रकरणी अटक केली. त्याने भिवंडीतील दोघांना ४० बॉक्स विदेशी मद्य आणि बियरची विक्री केल्याची कबूली दिली. त्यानेच दिलेल्या माहितीवरुन शुक्रवारी सकाळी भिवंडीतील एका हॉटेलमध्ये छापा टाकून हाँटेल मालक संतोष पुजारी आणि नितेश पुजारी यांना अटक करण्यात आली. अंजूर फाटा येथील हॉटेल सायमन येथे झालेल्या या कारवाईमध्ये देशी, विदेशी, बिअरचे ४१ बॉक्समधील एक लाख चार हजार ५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरु असून सिल्वासा मधील हाँटेल मालकाला नोटीस बजावल्याची माहिती निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली. तर
डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार यांच्या पथकाने १५ नोव्हेंबर रोजी मोठी देसाई भागातील खाडी किनारी असलेल्या गावठी दारुच्या अड्डयावरुन ३६०० लीटर रसायनासह सुमारे एक लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे................................