जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काेकण विभागीय भरारी पथकाने बेकायदेशीररित्या मध्यप्रदेशातून तस्करी केलेल्या देशी मद्याच्या साठा जप्त केल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी साेमवारी दिली. या कारवाईमध्ये गावठी मद्यासह नउ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी आणि सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने वाहन तपासणीचे आदेश दिले हाेते. याच पाश्र्वभूमीवर विभागीय उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काेकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी आपल्या पथकासह १७ नाेव्हेंबर २०२४ राेजी मुंबई आग्रा हायवेवर तपासणी नाका लावून संशयित वाहनांची तपासणी केली. त्यावेळी एका चार चाकी टेम्पाेची त्यांनी तपासणी केली. यामध्ये धान्याचा भुसा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतू, संशय बळावल्याने त्यांनी वाहन चालकाकडे कसून चौकशी करुन या वाहनाची तपासणी केली. तेंव्हा या टेम्पाेमध्ये मध्यप्रदेशात निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या मद्याचे एका नामांकित ब्रॅन्डचे १०१ बाॅक्स आढळले. यामध्ये १८० मिली क्षमतेच्या पाच हजार ५० बाटल्या आढळल्या.
या प्रकरणामध्ये सागर पाडवी (रा. भिलाटी, ता. जि. नंदुरबार) याला अटक करुन परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोही जप्त केला. या टेम्पाेतून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असलेले देशी मद्याचे १०१ बॉक्स आणि ५० गोण्या भुसा असा सुमारे नउ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, एच. बी. यादव, व्ही. व्ही. सकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.