ठाणे: अवैध दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या सराईत दारू विक्रेत्यांना ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे. समाजविघातक कृत्य करणाऱ्या चाैघांवर या विभागाने एमपीडीए कायद्यातर्गत कारवाई केल्याने त्यांची थेट कारागृहात रवानगी झाल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डाॅ. निलेश सांगडे यांनी शुक्रवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूची विक्री, निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. अशा गुन्हेगारी लोकांमुळे समाजातील सुरक्षा धोक्यात येते. समाजात समाजविघातक कृत्ये घडण्याचा धोका संभवतो. त्यामुळे त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी समाजविघातक कृत्य करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ११ जणांची यादी तयार करून त्यातील चाैघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती. सादर केलेल्या साक्षी पुरावांच्या आधारे न्यायालयाने चक्कमसरी आकाश (उल्हासनगर), रूपा उबाळे (पिसवली कल्याण), भास्कर रंगय्या कासम (भिवंडी) आणि सैजात मुस्तफा खान (उल्हासनगर) या चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांना येरवडा, नाशिक आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आणखी सात जणांची नावे अशाच कारवाईसाठी न्यायालयात पाठवली जाणार असल्याचीही माहिती डॉ. सांगडे यांनी दिली.
- अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्या सराईत आरोपीवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. या चाैघांना नियमानुसार वेळोवेळी समज दिलेली होती. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही घेतले हाेते. तरीही त्यांच्यातील गुन्हेगारी वागणुकीत काही सुधारणा आढळली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून समाजविघातक कृत्य घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.डाॅ. निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे.