ठाणे : राज्य शासन दिलेल्या आश्वासनाला जागले नसल्याचा आराेप करून राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा निर्धार केला आहे. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची बैठक आज पार पडली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी लाेकमतला सांगितले.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीस अनुसरून राज्य शासनाकडून जाेरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयाेग काेणत्याही क्षणी निवडणुका लावण्याच्या तयारी आहे. त्यात महत्वाची भूमिका पार पडणारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसून विसर पडलेल्या राज्य शासनाला आश्वासनांच्या पुर्ततेची आठवण करून दिली आहे. या आधी राज्य शासनाने कर्मचारी, शिक्षकांच्या समन्वय समिती साेबत दीर्घ काळ चर्चा केली. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी-शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचं आश्वासन दिले हाेते. पण आजपर्यंत कोणतीच सकारात्मक कार्यवाही दिसून आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता पुन्हा निर्धार करून बेमुदत संप घाेषीत केला आहे, असे गव्हाळे यांनी सांगितले.
राज्यातील कर्मचारी,शिक्षकांच्या सुधारित पेन्शनसह केंद्राप्रमाणे ग्रॅच्युईटी, १२ वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन, अंशराशीकरण पुनर्स्थापना, केंद्राप्रमाणे सर्व कर्मचारी, शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी हा बेमुदत संप करण्यात येत आहे. याशिवाय सेवानिवृत्तीचे वय ६० करा, विविध संवर्गातील रिक्त असलेली ४० टक्के पदे कायमस्वरुपी नियुक्तीव्दारे भरा, विना अट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, शैक्षणिक विभागातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा, नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा आदी विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपासाठी आता सज्ज झाले आहे.