ठाणे : ठाणे शहरात सध्या कोविड सेंटर म्हणून उपयोग होत असलेल्या माजीवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या २४ हजार ४७७ मीटर बांधकामासह लगतचे तब्बल २१ हजार ५५१ चौमीचे दोन भूखंड कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि जितो संस्थेला वार्षिक एक रुपये दराने ३० वर्षांच्या लीजवर देण्यास नगरविकास विभागाने साेमवारी मंजुरी दिली.
याठिकाणी टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून केवळ डॉक्टर्स आणि इतर स्टाफ उपलब्ध होणार असून, वास्तू उभारण्याचे काम जितो करणार असून, सर्व कामकाज टाटाच्या धर्तीवर चालणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचे मुंबईत जाण्याचे हेलपाटे वाचून ठाण्यातच कॅन्सरची ट्रिटमेंट घेणे शक्य होणार आहे. या हॉस्पिटलसाठीचा भूखंड आणि वास्तू मोफत देण्यासंदर्भात महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता; परंतु शासनाने त्यासाठी एक रुपया नाममात्र भाडेस्वरूपात पुढील ३० वर्षांसाठी द्यावा असे आदेश पारित केले आहेत.
ठाणे महापालिकेने या ठिकाणी टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. यामध्ये सदरची वास्तू मोफत देण्याबाबत त्यात उल्लेख केला होता. त्यानंतर राज्य शासनाने आता ग्रीन सिग्नल दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ठाणे महापालिका, टाटा मेमोरियल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर अंतिम मोहोर उमटविण्यात येणार आहे.
कर्करुग्णांचे वाढते प्रमाण, महागडे उपचार आणि मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा ताण, या बाबी लक्षात घेऊन ठाण्यात अत्याधुनिक उपचारांची सोय असलेले सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल असावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. त्यांच्या सूचनेवरून ठाणे महापालिकेने टाटा मेमोरियल सेंटरसमवेत अशा प्रकारचे रुग्णालय उभारण्याबाबत चर्चा केली. टाटा मेमोरिअल सेंटरने याबाबत स्वारस्य दाखविले. त्यानंतर आता नगरविकास विभागाने सदरचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे.
अशी असू शकते कॅन्सर रुग्णालयाची रचना
टाटा मेमोरियल हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेली तळ १० मजले स्वरूपाची इमारत कॅन्सर रुग्णालयासाठी वापरात आणणे शक्य असल्याचे कळविले असून, रुग्णालय संकुलामध्ये रेडिओथेरपी, इतर अभियांत्रिकी सेवा, कँटीन, डॉक्टर्स व नर्सेस यांच्यासाठी निवासस्थाने, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी धर्मशाळा आदींची आवश्यकता असल्याचे कळविले आहे. इतर सुविधा विकास प्रस्तावामधून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या वाढीव बांधीव क्षेत्रामध्ये विकसित करता येणे शक्य आहे. त्यानुसार हे काम जितोच्या माध्यमातून करण्याचे प्रस्तावित केले आहे.