लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या निर्मात्यांनी गुजरात, हैदराबाद येथे मोर्चा वळवला आहे. ठाणे हे अनेक मालिकांच्या शूटिंगचे आवडते डेस्टिनेशन आहे. मुंबई, ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने राज्य सरकार केव्हा शूटिंगवरील बंदी उठवते आणि पुन्हा ठाण्यात शूटिंग सुरू करतो, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचा प्रकोप सुरू होताच सरकारने शूटिंगवर बंदी आणली. त्यामुळे निर्माते, वाहिन्यांची पंचाईत झाली. ‘मेरे साई, अहिल्या, गणेश, जिजाऊ’ या मालिकांनी गुजरातमधील उंबरगाव हे महाराष्ट्राच्या सीमेलगतचे गाव गाठून तेथे मालिकांचे शूटिंग सुरू केले. काही मालिकांचे शूटिंग वलसाड, दमण, सिल्वासा येथे सुरू आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ व ‘सूर नवा-ध्यास नवा’ यांसारख्या मालिका व कार्यक्रमांचे शूटिंग गोव्यात सुरू होते. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या निमंत्रणावरून निर्मात्यांनी गोवा गाठले होते. मात्र गोव्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने गोव्यात शूटिंगवर बंदी आली. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीतही काही मालिकांचे शूटिंग सुरू आहे.
सुप्रसिद्ध निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, शेतकरी जसा पावसाची वाट पाहतो, तसे सर्व कलाकार, तंत्रज्ञ हे महाराष्ट्र सरकार केव्हा शूटिंगला परवानगी देते याची वाट पाहत आहेत. आम्ही सारेच कुटुंबापासून दूर वेगवेगळ्या राज्यांत सध्या शूटिंग करीत आहोत. काही कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला. त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. काहींचे निधन झाले. यामुळे घरापासून दूर असलेल्यांच्या जिवाची घालमेल झाली. काहींनी शूटिंग सोडून परतण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या काळजीमुळे सारेच चिंतेत आहेत. त्यामुळे सरकारने लवकर शूटिंगला परवानगी द्यावी.
गतवर्षी मे महिन्यात सरकारने शूटिंगला परवानगी दिली. तेव्हापासून दर आठवड्याला सेटवरील प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जात आहे. सर्वांचा दोन लाखांचा कोविड विमा उतरवला होता. यंदा पाच लाखांचा विमा उतरवला आहे. जर एखाद्याचे निधन झाले, तर कुटुंबाला २५ लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रात व विशेष करून मुंबई, ठाण्यात मालिकांची शूटिंग ही बंदिस्त ठिकाणी होतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांमुळे संसर्ग पसरू नये याकरिता काही कामगार, तंत्रज्ञ यांची निवासाची व्यवस्था केली जाते. जेथे शूटिंग सुरू असते, तेथे व कपडेपटाचे निर्जंतुकीकरण केले जाते. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचे मार्गदर्शन घेऊन कलाकार, कामगार यांनी कोविड प्रसार टाळण्याकरिता काय खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले असून त्याचे पालन केले जात आहे. एवढी काळजी घेतल्याने दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात शूटिंगला परवानगी मिळेल, असे वाटत होते. मात्र काही काळ रुग्णवाढ असल्याने शूटिंग बंद केले असले तरी, लवकरच परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
.........