अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भाजप हा राज्यस्तरीय पक्ष टिकून देत नाही. त्यांनी ज्या ज्या पक्षांबरोबर युती केली, ते पक्ष मगरी सारखे गिळून टाकल्याची टिका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. भाजपचे चाल आणि चरीत्र फार वेगळे आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक अशी त्यांची निती असल्याची टिकाही त्यांनी केली.
ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. ठाणे आणि कल्याणच्या जागेवरुन आव्हाड यांना छेडले असता त्यांनी ही टिका केली. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या रक्ताच्या आहेत, आणि त्यांना जर राजकीय फायदा घ्यायचाच असता तर त्यांनी सुप्रिया सुळे पवार असे नाव लावले असते. त्यात अशा निवडणुका या कर्तुत्वावर लढवाव्या लागतात. तुमचा लोकसभेमधील परफॉर्मस काय यावर लढविल्या जातात असेही ते म्हणाले. निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नसल्याने आणि तुम्हाला आता कॉनीफडेन्स आलेला असून आता आपले काहीच चालू शकत नाही, हे कळून चुकले असल्यानेच असे मुद्दे काढत असल्याची टिकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. विकासाच्या मुद्यावरुन भाजपला निवडणुका लढवायच्याच नाहीत, दोन कोटी नोकºया देणार होते, काय झाले? आज ८३ टक्के युवक बेरोजगार आहेत, याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला.
हिंदु, मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नसल्याचेही ते म्हणाले. विविध नोकºयांसाठी परप्रातींय राज्यात आलेले आहेत. मराठी माणसाला आता कुठेच स्थान राहिलेले नसल्याचे सांगत, ज्या दिवशी मराठी माणसाला ५० खोक्यांना विकले त्या दिवसापासून मराठी माणसाचे स्थानही गमावले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजपवाल्यांना हे लक्षात आले आहे की हे पैशांसाठी हापहापले असून त्यांना पैसे टाका आणि विकत घ्या असे सुत्र आजमावले जात असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीत खुले आम अमिषे दाखविले जात असल्याबाबत त्यांना छेडले असता, बेशीस्तपणाने भाजपवाले वागत असून निवडणुक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवडणुक विभाग हे भाजपवाल्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याची टिकाही त्यांनी केली.
प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी, त्यातून रुसवे फुगवे होत असतात. परंतु वरीष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असेही ते म्हणाले. तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत असे म्हणावे लागत असल्याचे सांगत आव्हाड यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टिका केली. आजही पटेल यांना शरद पवार यांचे नाव घेऊन चर्चेत राहावे लागत असल्याचेही ते म्हणाले.