डोंबिवली : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेकायदेशीरपणे ४५६ कोटींच्या प्रस्तावित रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या काही कामांचे भूमिपूजन आणि वेदपाठशाळेच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप मनसेने केला आहे. चव्हाण यांनीडोंबिवलीकरांची फसवणूक केली असून त्यांनी विश्वासार्हता गमावल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या ४५६ कोटींच्या काही कामांचे तसेच वेदपाठशाळेचे उद्घाटन रविवारी पार पडले. याला मनसेचे केडीएमसीतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी हरकत घेतली आहे. एमएमआरडीएकडून केवळ तत्त्वत: मंजुरी मिळाली असून रस्त्यांचाडीपीआर तयार करण्यासाठी त्यांच्याकडून कन्सल्टंट नेमण्यास सांगण्यात आले आहे. कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यासर्व गोष्टी पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ४५६ कोटींच्या रस्त्यांची घोषणा आणि त्यातील काही कामांचे भूमिपूजन करणे म्हणजे नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांशी सलोख्याचे संबंध असताना गेल्या साडेचार वर्षांत राज्यमंत्र्यांनी निधी का नाही आणला, असाही सवाल त्यांनी केला. केडीएमसीने वृद्धांच्या संगोपनासाठी देऊ केलेल्या जागेत बेकायदेशीरपणे वेदपाठशाळेचे उद्घाटन करण्याचा घाट घालून एकप्रकारे डोंबिवलीतील ब्राह्मण समाजाचीही राज्यमंत्र्यांनी फसवणूक केली असून याची कल्पना ब्राह्मण महासंघाला नसावी, असेही हळबेम्हणाले. आमचा वेदपाठशाळेला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने होणार असेल तर त्याला आम्ही हरकत घेणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगरी समाजातील मानबिंदू असलेले आन आणि मान ठाकूर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळीही महापालिकेतील लोकप्रतिनिधींना तसेच मित्रपक्ष शिवसेनेलाही अंधारात ठेवून कार्यक्रम उरकण्यात आला. मागच्या निवडणुकीतील स्मारकाचेवचन येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यांना आठवले असल्याचे सांगताना भाजपकडून जातीचे राजकारण खेळले जातअसल्याचा आरोपही यावेळी हळबे यांनी केला.
शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही राज्यमंत्र्यांच्या कृतीवर चांगलेच तोंडसुख घेतले. डोंबिवलीकरांना जातीपातीमध्ये विभागून चुचकारण्याचा प्रयत्न करून राज्यमंत्री डोंबिवलीमध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत. त्यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. आयुक्त आणिअधिकारीही त्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. महापालिकेच्या इस्टेट मॅनेजरवर दबाव टाकून बेकायदेशीरपणे वेदपाठशाळेचा घाटघालण्यात आला असून याला आयुक्तही तितकेच जबाबदार आहेत. फसव्या आणि खोटारड्या राज्यमंत्र्यांपासून सावध राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.