लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंब्य्रापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर आणि राबोडी या सर्वच ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या चार कंपन्या तैनात करण्याचा निर्णय ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला आहे. मुंब्रा भागात मंगळवारी दुपारी स्वत: पोलीस आयुक्तांनी भेट देऊन नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले.राज्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू झालेली आहे. तेंव्हापासून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांच्या परिसरामध्ये स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अनेक ठिकाणी गृहरक्षक दलाचीही मदत घेण्यात आली आहे. तरीही बहुतांश भागांमध्ये नागरिक अगदी क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. अनेकदा घरातील किरकोळ सामान आणण्याचे तसेच घरातील व्यक्ती आजारी असल्याची कारणे दिली जात आहेत. अनेकदा केवळ फेरफटका मारण्यासाठीही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान पहायला मिळत असल्याचे पोलीस सांगतात. वागळे इस्टेट, मुंब्रा आणि राबोडी या भागात वारंवार पोलिसांची गस्त असूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे आढळले. अखेर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी केलेल्या मागणीनंतर मुंब्रा भागात २९ मार्च पासून राज्य राखीव दलाची एक संपूर्ण कंपनी (एका कंपनीमध्ये तीन प्लाटून्स असतात. एका प्लाटून्समध्ये २५ ते ३० सशस्त्र पोलीसांची संख्या असते.) तैनात केली आहे. ३१ मार्च पासून भिवंडीतही एक कंपनी, उल्हासनगर आणि कल्याण या दोन शहरांसाठी एक स्वतंत्र कंपनी तर राबोडी, ठाणे शहर आणि कळवा या विभागांसाठी तीन प्लाटून्स आहेत. तसेच वागळे इस्टेटसाठी एक प्लाटून्स तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.* मुंब्रा परिसरात मंगळवारी दुपारी १२ ते २ या काळात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे आणि पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी वेगवेगळया भागात फिरुन नागरिकांचे प्रबोधन केले. प्रत्येकाने काळजी घ्या. अनावश्यक कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन यावेळी फणळकर यांनी केले. तरीही कोणी न जुमानले नाहीतर मात्र कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुंब्य्रापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण आणि ठाण्यातही राज्य राखीव दलाची कुमक तैनात
By जितेंद्र कालेकर | Published: March 31, 2020 8:31 PM
ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये वारंवार आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंब्रा परिसरात दोन दिवसांपूर्वीच राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) तुकडी तैनात केली होती. आता पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील बहुतांश भागांमध्ये एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे.
ठळक मुद्देमुंब्रा भागात पोलीस आयुक्तांनी केले नागरिकांचे प्रबोधननागरिकांनी जुमानले नाहीतर दिला कडक कारवाईचा इशारा