- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमी नवीन मतदार नोंदणी सुरू असून मतदार यादी नं-९६ मध्ये बनावट आधारकार्डसह अन्य कागदपत्रांद्वारे नवीन मतदार नोंदणी केल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. बनावट कागडपत्राद्वारे मतदार नोंदणी करणाऱ्या संबंधीतावर कारवाई करण्याचे निवेदन तहसिलदार यांना गुरवारी दिले.
उल्हासनगरात नवीन मतदार नोंदणी करण्यात येत असून ९ हजारा पेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती तहसीदार निवडणूक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान मतदार यादी क्रं-९६ मध्ये संबंधित बीएलओ यांनी राजकीय पक्ष नेत्यांच्या दबावाखाली बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे २५० पेक्षा जास्त बोगस नवीन मतदारांची नावे नोंदविली. मात्र सदर माहिती उघड झाल्यावर, नोंदविलेले नावे काढून टाकल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. अशी बोगस नावे बनावट कागदपत्राद्वारे मतदार यादी क्रं-९६ मध्ये नोंदविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी चौधरी यांनी तहसीलदार कोमल ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याप्रकारने एकच खळबळ उडाली आहे.
नवीन मतदारांची नोंदणी केल्यानंतर, त्याची सुनावणी घेतली जाते. त्यानंतरच त्या नावाचा समावेश नवीन मतदार यादीत केला जातो. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आरोप केलेल्या अश्या बोगस मतदारांची चौकशी नियमानुसार करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार ठाकूर यांनी दिली. चौधरी यांच्या आरोपाने नवीन मतदार नोंदणी वादात सापडण्याची शक्यता व्यक्त होत असून बोगस मतदार नोंदणी केल्याचे उघड झाल्यास संबंधीतवार सक्त कारवाई करण्याचे संकेत तहसीलदार कोमल ठाकूर यांनी दिले. तसेच नवीन मतदार नोंदणी सुरू असून ९ हजारा पेक्षा जास्त नवीन मतदार नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.