- सुरेश लोखंडे
ठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अधिकार अभियानाने राज्यभर गुरूवारी निदर्शने करण्याचे निश्चित झाले आहे.
दोनच सदस्य असणा-या अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशन कार्ड आता रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकण्यात येणार आहे. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणशी पाच किलो धान्य मिळते तर अंत्योदय लाभार्थीना कितीही सदस्य असले तरी ३५ किलो धान्य मिळते. कारण अंत्योदय कुटुंबे सर्वात गरीब आहेत. आदिम जमाती उदा. कातकरी कोलाम, किंवा विधवा/ परित्यक्ता कुटुंबप्रमुख असणारी , दुर्धर आजाराने ग्रस्त असणा-या कुटुंबप्रमुखाचे कुटुंब इ. त्यामधे मोडतात. बहुधा व्रुद्ध पती पत्नी अथवा एकल स्त्रिया व त्यांचे एखादे मुल असणारीच कुटुंबे दोन सदस्य असणारी असतात.( हे निकष सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहेत.) त्यांचे ३५ किलो धान्य आता सबका साथ सबका विकास म्हणणा-या सरकारला डोळ्यात सलू लागले आहे. २१ सप्टेंबरला प्रधान सचिवांनी आदेश काढून सदर कार्डे रद्द करण्यास सांगण्यात आले आहे व पाच माणसांपेक्षा जास्त सदस्य संख्या असणा-या प्राधान्य गटातील कुटुंबांची कार्डे रद्द करून त्यांना अंत्योदय मधे घालावे असेही हा आदेश म्हणतो. हा सगळा तुघलकी कारभार सर्वात गरीब जनतेच्या ताटातले अन्न काढून घेणारा असल्याच्या आरोपा खाली ठाणेसह राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.
प्रधान सचिवांचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणारा असल्याचा आरोप आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेशनवरील साखर देखील बंद करण्यात आली आहे. ती फक्त अंत्योदय कुटुंबांना एकच किलो, ती देखील वाढीव दराने मिळणार आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश छत्तीसगडसारखी राज्ये रेशनवर डाळ, तेल , आटा व अन्य वस्तू देखील देतात पण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी भर घाल ण्याचा दावा करणारे संपन्न महाराष्ट्र राज्य व येथील सरकार सर्वात गरीब कुटुंबांसाठी ही नादानी करते याचा आम्ही तीव्र निषेध अन्न अधिकार अभियानच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानचे संजीव साने, स्वराज इंडियाचे, उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर यांनी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात दि. १२ ऑक्टोबरला हा निषेध करण्यात येणार आहे.
कोल्हापूर सांगली, नागपुर, पुणे, नंदुरबार, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई , पालघर,अमरावती, रायगड, ठाणे सहित महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलन होणार आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते दुपारी ५ वाजता निदर्शन केले जाणार आहे.