ठाणे : नवोदित कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून अभिनय कट्ट्यातर्फे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तब्बल १२६ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यात प्रथम क्रमांक शिवानी मुरकार, द्वितीय अंकिता मौर्य तर तृतीय सचिन फडतरे यांनी पटकावला.
केवळ ठाणेच नव्हे तर पालघर, रायगड, नाशिक, अमरावती, सांगली, बारामती, चिपळूण या ठिकाणांहून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांनी यात अनेक विषयांना हात घालत त्यावर भाष्य केले. स्पर्धेतील बरेचशे विषय राजकीय,सामाजिक जाणिवा जिवंत ठेवण्याचे काम करत होते. अभिनय कट्ट्याला आठ वर्ष पूर्ण होत असून आतापर्यंत कट्टयावर दहा हजारांपेक्षा जास्त पात्रे रंगवली गेली आहेत. एक नाट्य चळवळ म्हणून अभिनय कट्टा सातत्याने कलाकारांना संधी देण्याचे काम करत असते. यंदाचे हे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते,दरवर्षी हि स्पर्धा कट्टयावर घेण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले. अशा स्पर्धा घेणे हे केवळ स्पर्धकांसाठीच नाही तर आयोजकांसाठी देखील ऊर्जा देणारे काम आहे.या नाट्य स्पर्धांमधूनच कलाकारांना पुढे मालिका, सिनेमा, नाटक या क्षेत्रात काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले. अशा अनेक स्पर्धा करतच मी मालिकेपर्यंतचा यशस्वी प्रवास करू शकलो.सुरवातीला छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. अभिनयातील सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर आज प्रमुख भूमिका करताना आनंद होत आहे. याचं सगळं श्रेय मी या नाट्यस्पर्धांना देतो असे अभिनेता विवेक सांगळे याने सांगितले. यावेळी निवेदन आदित्य नाकती व शिल्पा लाडवंते हिने केले. वासंती वर्तक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. एकपात्री स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत वैद्य व दिग्विजय चव्हाण हे होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांस बक्षीस म्हणून रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा वाढता प्रतिसाद व स्पर्धकांची संख्या लक्षात घेता आयोजकांनी पाच उतेजनार्थ व दोन विशेष पारितोषिके जाहीर केली. तसेच यावेळी कट्टयावर विभागातील लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा याचे आयोजन केले होते.यंदाचे हे या स्पर्धांचे पहिलेच वर्ष असले तरी एकूण ९५ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.
*स्पर्धेचा निकाल*
उत्तेजनार्थ: उमेश कुळकर्णी, आकाश चव्हाण, सिध्दार्थ बेलवलकर, ईशा नार्वेकर, कल्याणी बागवाले.
विशेष पारितोषिक : आकांक्षा ठोंबरे, आर्यन जळगावकार