कल्याण: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आमदारांनी पाठिंबा द्यावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घरी आज गेले होते. आमदार घरी नसल्याने कार्यकत्र्यानी आमदारांच्या घरीच ठिय्या देत मराठा आरक्षणाच्या मागणीकरता जोरदार घोषणाबाजी केली.
आमदार भोईर हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अरविंद मोरे यांच्यासह श्याम आवारे व कार्यकर्ते आमदारांच्या घरी पोहचले. आमदार नसल्याने त्यांनी त्यांच्या घरीच ठिय्या दिला. घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी आमदारांचे भाऊ व शिवसेना नगरसेवक प्रभूनाथ भोईर हे मराठा क्रांती मोर्चाच्या भेटीसाठी पुढे आले. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारले. तसेच आमदार भोईर यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे लेखी पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका:यांना दिले आहे.
आज मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी विविध आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या पाठिंब्याचे पत्र घेत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका:यांनी कल्याण पूव्रेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचीही भेट घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे संजय मोरे, धनंजय जोगदंड यांनी एक निवेदन सादर करुन आमदारांकडे पाठिंब्याची मागणी केली. आमदार गाकवाड यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी आमदार गायकवाड यांनी विद्यमान सरकारवर मराठा आरक्षण प्रकरणी टिका केली. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, भाजपचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण टिकविले होते. विद्यमान सरकारला आरक्षण टिकविता आलेले नाही. हे सरकार मराठा समाजाच्या बरोबरीने काम करण्यास तयार नाही असे मला वाटते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात टिकले नाही. याकडे लक्ष वेधले आहे.