ठाणे : आता शाळा-महाविद्यालये लवकर सुरू होण्याची गरज आहे. घरात मुले राहून मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीयदृष्ट्या मुलांची वाढ होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मिळत नाहीत. एक काळ आम्ही विद्यार्थ्यांच्या हातून मोबाईल काढून घेत होतो. आता मुलांना तो देण्याची वेळ आली आहे. हे दीर्घकाळ चालणार नाही. यातून बाहेर येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. नरेंद्र पाठक यांनी बुधवारी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांना आदर्श विकास मंडळातर्फे ‘कर्मवीर शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर ते बोलत होते. केबीपी महाविद्यालयात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज शिंदे, सचिव संतोष शिंदे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की, केबीपी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संतोष गावडे आदी उपस्थित होते.
कर्म म्हणजे काय आणि कर्मवीर पुरस्कार का दिला जातो, हे समेळ यांनी स्पष्ट केले. आयुष्यभर ज्यांनी ज्ञानदानाचे काम केले त्यांना कर्मवीर पुरस्कार मिळालाच पाहिजे. आपण जे विद्यार्थ्यांना शिकवतो ते कर्म प्रामाणिकपणाने करा, असा उपदेश शिक्षकांना दिला. यावेळी मोरे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. मंदार टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.