कल्याण : रिक्षाचालकांची मुजोरी व मनमानी भाडेवसुलीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत असतानाच रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन टवाळखोरांच्या हाती गेल्याने त्यांचा प्रवासही धोकादायक झाला आहे. दुसरीकडे विनापरवाना रिक्षाचालवणाऱ्या या मुलांविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, असा पवित्रा येथील रिक्षाचालक-मालक असोसिएशनने घेतला आहे.
रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून होत आहे. मात्र, तरीही परिवहन विभागाने परवाना देणे सुरूच ठेवले आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.रिक्षा चालवणाºया चालकांकडे परवाना आणि बॅज असणे बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षाचालक बॅच आणि परवाना नसलेल्या व्यक्तींना रिक्षा चालवायला अथवा भाड्याने देत आहेत. त्यात १५ ते १६ वर्षांची मुलेही आहेत. रिक्षाचालकांसाठी बंधनकारक असलेला गणवेश घालण्याऐवजी ते बर्मुडा, हाफ पॅण्ट, टी-शर्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. त्याचबरोबर स्टॅण्ड सोडून ते प्रवासी घेतात. त्यातील अनेक जण गुटखा, मावा, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही करतात. उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडेआकारणी ते करत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालकही बदनाम होत आहे.
दरम्यान, रविवारी कल्याणमध्ये झालेल्या रिक्षाचालक-मालक असोसिएशनच्या बैठकीत अन्य विषयांसह अल्पवयीन रिक्षाचालकांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, अब्दुल शेख हे पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षा पासिंगची समस्या, प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वाभाडे आकारणे, बॅज आणि गणवेश नसणे आदी मुद्यांसह वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून अल्पवयीन रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत तीव्र नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. अल्पवयीन टवाळखोर रिक्षाचालकांमुळे महिला प्रवाशांचा प्रवास धोक्याचा झाला असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
जाग येणार कधी ?एकीकडे कारवाई सुरू असल्याचा दावा आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून केला जात असलातरी आजही कल्याण असो अथवा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील स्टॅण्डवरील चित्र पाहता बिनधास्तपणे अल्पवयीन रिक्षाचालक रिक्षा लावून भाडे घेत आहेत. मुजोरी, वादावादी असे प्रकार वारंवार त्यांच्याकडून घडत असतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही होत आहे.