ठाणे : ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी या मनपा आणि जि.प.अंतर्गत ३४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्थापन केलेल्या स्टेम कंपनीला दोन वर्षांपासून आर्थिक नवसंजीवनी मिळाली असून सतत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीला २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २७ कोटींचा रुपयांचा फायदा झाला होता. आता २०१६-१७ या आर्थिक वर्षातही २० कोटींचा फायदा अपेक्षित असून स्टेम प्राधिकरणाने सीएसआरअंतर्गत पंतप्रधान निधीसाठी एकूण ११ लाखांचा निधी दिला आहे.ठाणे महानगरपालिकेसह मीरा-भार्इंदर, भिवंडी आणि जिल्हा परिषद ठाणेअंतर्गत एकूण ३४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी २०१० साली स्टेमची निर्मिती करण्यात आली. परंतु, ती झाल्यानंतर कंपनी सतत तोट्यात चालत होती. २०१०-११ साली या कंपनीला १ लाख ५७ हजार रुपयांचा तोटा झाला होता. तर, ११-१२ साली १४ कोटी ४४ लाख, १२-१३ मध्ये ३ कोटी ४७ लाख, १३-१४ मध्ये २९ लाख आणि २०१३-१४ मध्येच हा तोटा १३ कोटी ५५ लाखांच्या घरात गेला होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून हे प्राधिकरण फायद्यात आले असून या वर्षी या कंपनीला २२ कोटींचा नफा अपेक्षित आहे. दरम्यान, बुधवारी स्टेमच्या २०१७-१८ च्या एकूण १६९.६४ कोटी रु पयांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. स्टेम प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक झाली. या वेळी स्टेमचे संचालक नरेश गीते, भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्त योगेश म्हसे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्टेमला आर्थिक वर्षात हवा २० कोटींचा फायदा
By admin | Published: March 30, 2017 6:29 AM