मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेने मीरारोडच्या एका प्लॅस्टीक विक्री व गोदामावर टाकलेल्या धाडीत बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांसह अन्य बंदी असलेल्या वस्तुंचा सुमारे १ हजार २२५ किलोचा साठा जपत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले प्लॅस्टीक बंदीचे आवाहन आणि राज्यात प्लॅस्टीक बंदीचा कायदा असताना भाजपाच्याच महिला पदाधिकारायाच्या पतीचे सदर गोदाम असल्याचे समोर आले आहे.पंतप्रधानांनी प्लॅस्टिक वापरावर बंदीचे आवाहन केले असुन दुसरीकडे भाजपा युतीचे शासन असताना राज्यात प्लॅस्टीक बंदीचा कायदा लागु करण्यात आला आहे. प्लॅस्टीक खाऊन गाई, कुत्रे आदी भटक्या जनावरांच्या जिवावर बेतत आहे. नाले - खाड्या जाम होऊन प्रदुषण वाढले आहे. प्लॅस्टीक मधुन अन्न - पेय घेतल्याने मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. तसे असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास प्लॅस्टीक पिशव्यांसह बंदी असलेल्या प्लॅस्टीक वस्तुंची विक्री आणि वापर सुरुच आहे. या विरोधात सतत तक्रारी होत असुनही महापालिकेचे मुकादम, स्वच्छता निरीक्षक व अधिकारी वर्गा कडुन मात्र काणाडोळा केला जात आहे. तक्रार आलीच तर ठारावीक कारवाई केली जाते.मीरारोडच्या १५ क्रमांक बस स्थानका जवळील गौरव रिजेन्सी इमारतीत डी. के. ट्रेडर्स या नावाने प्लॅस्टीक विक्री व गोदामातुन बंदी असलेल्या पिशव्या आदी वस्तुंची खुलेआम विक्री केली जात असल्याची माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या कडे देण्यात आली. आयुक्तांनी या प्रकरणी स्थानिक अधिकारायांना कल्पना न देता शेजारील प्रभाग समिती क्र. ६ च्या पथकास कारवाईचे आदेश दिले. सदर पथकाने गोदामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांसह कंटेनर आदींचा मोठा साठा आढळून आला.आयुक्तांना प्लॅस्टिक साठा सापडल्याची माहिती दिल्यावर त्यांनी स्थानिक प्रभाग समिती क्र. ४ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड व पथकास पुढिल कारवाईसाठी पाठवण्यात आले. त्यांनी या गोदामा मध्ये सापडलेला बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा साठा जप्त करून दुकान चालका कडुन ५ हजारांचा दंड वसुल केला. जप्त मालाची नोंद करणे सुरु होते. तर जप्त मालाची पक्की खरेदी बिले सादर करण्यास दुकानदारास सांगीतले आहे. या धाडी वरुन स्थानिक अधिकारायांचे झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.सदर विक्री गोदाम हे सुमारे दोन - अडिज वर्षां पासुन सुरु असुन ते भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव रु पम झा यांच्या पतीचे आहे. तर सदर गोदामा समोरच भाजपाच्या नगरसेविका रुपाली मोदी यांचे कार्यालय आहे हे विशेष. तर शहरात सर्वत्र बंदी असलेल्या प्लॅस्टीकचा वापर व विक्री सुरु असुन सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे असे रुपम झा म्हणाल्या. तर कारवाई वेळी संतप्त दुकानदारांनी तर महापौर स्पर्धे वेळी पालिके कडूनच सर्रास बंदी असलेल्या प्लॅस्टिक ग्लास , प्लेट , चमचे आदींचा वापर केला गेला होता असा आरोप करत त्याचे व्हिडीओ आपल्या कडे आहेत असा गौप्यस्फोट केला.
भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या गोदामातून बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 9:03 PM