भिवंडी : पत्नी सरपंच असताना ग्रामपंचायत क्षेत्रात केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी वडूनवघर ग्रामपंचायतीचे कार्यालय फोडून हिशेबाचे कागदपत्रे चोरणाऱ्या पतीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
कल्पेश पंडित पाटील (३३) असे अटक केलेल्या माजी सरपंच महिलेच्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी अस्मिता कल्पेश पाटील २०१५-१७ या कार्यकाळात सरपंच होत्या. त्यावेळी विविध योजनांची विकासकामे केवळ कागदोपत्री दाखवून सुमारे ६४ लाखांचा अपहार केल्याचा आरोप पतीपत्नीच्या विरोधात केला जात आहे. या भ्रष्ट कामांची माहिती स्थानिक नागरिक संभाजी पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी माहिती अधिकारात संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. या कागदपत्रांमुळे गावात आपली नाचक्की होईल,या भीतीने कल्पेश याने २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून कार्यालयातील दोन लोखंडी कपाटातील दोन जुने व नवे ग्रामनिधी कॅश बुक रजिस्टर, दोन पाणीपट्टी कॅशबुक, दोन जनसुविधा कॅशबुक रजिस्टर, स्वच्छ भारत अभियान रजिस्टर ,एमआरजीएस कॅशबुक, तीन १३ व्या वित्त आयोगाचे कॅशबुक,दोन १४ व्या वित्त आयोगाचे कॅशबुक आदी चोरून नेल्याची तक्रार ग्रामसेवक मनोज बाबू प्रजापती याने केली. भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येईल या भीतीने कादगपत्रे चोरल्याची कबुली कल्पेश याने दिली.