भिवंडी : अमेरिकेतील शिकागो तसेच कॅनडा येथे अडीच कोटी रुपयांच्या बेडशीटच्या ऑर्डरच्या बदल्यात चक्क सिमेंटचे ब्लॉक भरून कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या चौकडीला नारपोली पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ९२ लाखांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.भिवंडी येथील एनएमके टेक्स्टाईल मिल्स व ग्लोब कॉटयार्न या दोन कंपन्यांना शिकागो व कॅनडा येथील कंपनीने कॉटन बेडशीट बनवून देण्याची ऑर्डर दिली होती. कंपन्यांनी अनुक्रमे १ कोटी २६ लाख ९९ हजार ८०९ व १ कोटी १५ लाख असा एकूण २ कोटी ४१ लाख ९९ हजार ८०९ रुपयांच्या तयार बेडशीट सी बर्ड एजन्सीमार्फत ओमसाई लॉजेस्टिक यांच्या कंटेनरमधून न्हावाशेवा बंदरातून अमेरिकेस ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० रोजी पाठविल्या. मात्र अमेरिकेत या कंटेनरमध्ये बेडशीटऐवजी चक्क सिमेंट ब्लॉकचे वजनी बॉक्स मिळाल्याने एकच खळबळ उडाली. यासंदर्भातील माहिती संबंधित कंपनीने भिवंडीतील कंपनी चालकांना दिली असता या फसवणुकीप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मालाचा अपहार झाल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके करीत असताना नारपोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे व त्यांच्या पथकाने कंटेनरचे जीपीएस ,कंटेनर चालकांचे मोबाइल सीडीआर या बाबींचा तपास करून उत्तर प्रदेश येथे तब्बल १९ दिवस पाळत ठेवून चार आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. यात उत्तर प्रदेश व वसई येथे लपवून ठेवलेल्या सुमारे १ कोटी ९२ लाख ८७० रुपयांच्या बेडशीट जप्त करण्यात यश आले. मोहम्मद युनूस अन्सारी (४५), मोहम्मद फारुक मोहम्मद यासीन कुरेशी (४६), मोहम्मद रिहान नबी कुरेशी (२९), मोहम्मद मुल्तजीम मोहम्मद हजीम कुरेशी (३०) अशी आरोपींची नावे आहेत.
बेडशीट काढून भरले सिमेंटया गुन्ह्यातील आरोपींनी ऐवजाचा अपहार करण्यासाठी कंटेनर वसई येथे नेऊन त्यातील बेडशीट काढून तेवढ्या वजनाचे सिमेंट ब्लॉक बॅाक्समध्ये भरून तो ऐवज अमेरिकेस पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.