कल्याण : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेसतर्फे रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे या परिसरात काही काळ वाहतूककोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.
उत्तर प्रदेश येथील सोनभद्र येथे गुरुवारी जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गांधी तेथे गेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ कल्याण शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि रस्ता मोकळा करून दिला. या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, शकील खान, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशात लोकशाहीचा गळा घोटून हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. त्यातूनच, गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ठाणे शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीनेही सायंकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.