वसई : पालघर जिल्ह्यात १ जानेवारी ते ३ मार्च या गेल्या तीन महिन्यात रोजगार हमी योजनेतून ९ हजार ०२४ कामे करण्यात आली.या कामांसाठी मजुरांना १३ कोटी ४८ लाख २८ हजार रुपये मिळणे आवश्यक होते.त्यासाठी मजुरांनी अनेकदा हेलपाटे घालूनही त्यांना कष्टाचे पैसे मिळाले नाही. म्हणून पालघर, ठाणे, रायगड आणि नाशीक या तीन जिल्ह्यात एकाचवेळी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोच्या या दणक्यामुळे जव्हार येथील मजुरांचे १ कोटी ९ लाख रुपये त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात आले. पालघर, ठाणे जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी क्षेत्रात दारिद्रय, कुपोषण, भूकबळी, रोजगार न मिळाल्यामुळे होणाऱ्या आत्महत्या होत आहेत. त्यातच आदिवासींनी केलेल्या कष्टाचे पैसेही त्यांना मिळेनासे झाले आहेत. सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल शिरसाड फाटा येथे ११ वाजता रास्ता रोकोला सुरवात झाली. त्यात आत्माराम ठाकरे, गणेश उंबरसाडा, निलेश वाघ, पुजा काकड, स्रेहा साठे यांच्या नेतृत्वाखाली १५०० मजुरांनी भाग घेतला होता. यावेळी रामभाऊ वारणा, केशन नानकर, विमल परेड, किसन चौरे, दिनेश म्हात्रे आदि पदाधिकारी उपस्थित होते.वाडा येथे खंडेश्वरी नाका, विक्रमगड येथे शिवाजी चौक,जव्हार येथे शिवनेरी ढाबा, अंबाडी, घोडबंदरनाका, कल्याण-गावेली नाका, मुरबाड-तीनहात नाका, शहापूर-वासींद, रायगड-पनवेल येथेही याचवेळी रास्ता रोको करण्यात आला. रोजगार निर्मिती, कुपोषण निर्मूलन, आरोग्य व शिक्षणावरील तरतूदी कमी करणाऱ्या सरकारने समाजहिताविरोधी भूमिका जर बदलली नाही तर राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवींचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनी दिला. (प्रतिनिधी)
मजूरीसाठी महामार्ग रोखला
By admin | Published: April 06, 2016 1:55 AM