लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अतिसंसर्गजन्य विषाणू असलेल्या कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदी तसेच मनाई आदेशही पोलिसांनी लागू केले आहेत. तरीही काही नागरिक सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मॉर्निंग वॉक किंवा प्राणी फिरविण्याच्या निमित्ताने बाहेर पडू नये, अन्यथा कलम १८८ नुसार संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ठाण्यातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसद्वारे पोलिसांनी दिला आहे.ठाणे पोलिसांनी दिलेल्या या नोटीस वजा पत्रामध्ये सोसायटीचे सचिव तसेच रहिवाशांना उद्देशून काही सूचनाही केल्या आहेत. अशाच एका सोसायटीला नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनही केले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सोसायटीतील रहिवाशांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील सूचना देणे अपेक्षित आहे. यात सोसायटीतील सदस्यांपैकी कोणीही मॉर्निंग वॉक किंवा पाळीव श्वानांना फिरविण्यासाठीही विनाकारण बाहेर येऊ नका. अगदीच महत्चाच्या कामासाठी तसेच जीवनावश्यक वस्तू, भाजी आणि औषधे आणण्यासाठी एकाच व्यक्तीला बाहेर पडता येणार आहे. बाहेरील कोणालाही सोसायटीच्या आत शक्यतो प्रवेश देऊ नका. सर्वात महत्वाचे म्हणजे सोसायटीतील कोणत्याही सदस्याने दोन महिन्यांपूर्वी परदेशातून प्रवास केला असेल, त्यांच्याकडे कोणतेही नातेवाईक किंवा मित्र हे बाहेरच्या देशातून आले असल्यास तसेच कोणत्याही सदस्याला खोकला, ताप जास्त दिवस येत असेल तरी त्यांची माहिती तात्काळ ठाणे महानगरपालिका येथील कोरोना अतिदक्षता विभागाला द्यावी. सोसायटीतील कोणालाही घरामध्ये विलगीकरण केलेले असल्यास त्यांना दिलेल्या कालावधीपर्यंत घराच्या बाहेर पडू नये. ते घराबाहेर पडत असतील तर आपत्ती व्यवस्थापन जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याशी 022-25301740 किंवा 022-25371010 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नौपाडा पोलीस ठाण्याशी 022-25423300 किंवा 022-25444433 यावर माहिती द्यावी.विनाकारण बाहेर फिरणा-यांवर भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई केली जाईल. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही मांगले यांनी आपल्या नोटीशीमध्ये म्हटले आहे.