कल्याण : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कल्याण बस डेपोतील चालक व वाहकांनी डेपासमोरच रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या २० चालक व वाहकांना अटक करून त्यांची नंतर सुटका केली. या आंदोलनामुळे डेपो सायंकाळपर्यंत बंद होता. डेपो व्यवस्थापनाने खाजगी बस मागवून प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला.मनसे राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी सेनेचे पदाधिकारी महादेव म्हस्के आणि अविनाश भरणुके यांनी सांगितले की, कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचाºयांनी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण बस डेपोतही आंदोलन करण्यात आले. मात्र, व्यवस्थापनाने आंदोलन करण्यास मज्जाव केला. तसेच खाजगी बस मागवून कारभार हाकण्याचा प्रयत्न केला. आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी चालक व वाहकांना अटक केली. वाहक-चालकांच्या आंदोलनामुळे मंगळवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकही बस डेपातून बाहेर पडली नाही.दरम्यान, कल्याण डेपोत ५६७ चालक-वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी आहे. या डेपोतून ९० बस चालवल्या जातात. प्रत्येक बसच्या दिवसभरात तीन अशा एकूण २७० बस फेºया होतात. त्यातून दिवसाला पाच ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न बस डेपोला मिळते. या आंदोलनामुळे डेपोला किमान पाच लाखांचा फटका बसला आहे. कल्याणहून नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभरणी, नांदेड या भागात बस धावल्या नाहीत. त्याचा फटका ऐन दिवाळीत प्रवाशांना बसला.
एसटी कर्मचा-यांचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:09 AM