पनवेल : पळस्पे ते इंदापूर या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी ‘पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ रुंदीकरण प्रकल्पग्रस्त समिती’ २५ तारखेला तारा गावाजवळ रास्ता रोको करणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सरकारने २००९ मध्ये भूसंपादनाच्या नोटिसा काढल्या, परंतु आजपर्यंत भूधारक, घरमालक, तसेच प्रकल्पग्रस्तांना आपली किती जमीन संपादित होणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. त्यामुळेच अनेक गावकऱ्यांनी आपल्या घरांची डागडुजी केलेली नाही. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा मोर्चे, निदर्शने, उपोषणाचा मार्ग अवलंबला, मात्र आश्वासनापलीकडे प्रकल्पग्रस्तांच्या हाती काहीच लागले नाही. यादरम्यान अनेक अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या. संपादित जमिनीचे सीमांकन व्हावे, भूसंपादनातून वगळलेल्या जमिनीच्या हद्दी कायम कराव्यात, संपादित जमिनींना व घरांना चालू बाजारभावाप्रमाणे दर द्यावेत, गावांचा गावठाण विस्तार करावा, तोडलेल्या वृक्षांच्या दहापट वृक्षांची लागवड करावी व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी शेतकऱ्यांवर द्यावी, आदी मागण्यांसाठी हा रास्ता रोको केला जाणार आहे.परिसरातील ग्रामस्थांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीचे संतोष ठाकूर यांनी केला आहे. या आंदोलनात रामभाऊ पाटील, श्याम जोशी, भाई पाटील, राजेंद्र पाटील, हिराजी पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबई-गोवा मार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2015 4:54 AM