कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सात गावातील कोरोना रुग्णांना कोरोना रुग्णालय व टाटा आमंत्र येथे दाखल करुन घेतले जात नाही. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा पुरविण्याकरीता कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.
महापालिकेच्या 27 गावात निळजे आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत निळजे, घेसर, नांदिवली, गोळवली, हेदूटणे, काटई, कोळेगाव या गावांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रामार्फत सुविधा पुरविण्यात येत आहेत. पण सध्या या सात गावांची कर वसूली महापालिका करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आजदे यांच्या अंतर्गत घारीवली, संदप, मानपाडा, सोनारपाडा, दावडी या गावांना आरोग्य सेवा देण्यात येत आहे. या गावची आरोग्य सेवा महापालिकेच्या आरोग्य खात्यकडे वर्ग केली आहे.
मात्र निळजे आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सात गावांची आरोग्य सेवा महापालिकेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गावातील रुग्णांना महापालिकेने सुरु केलेल्या टाटा आमंत्रा येथील हेल्थ सेंटरमध्ये दाखल करुन घेतले जात नाही. या रुग्णांना ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे.
तांत्रिक कारणामुळे होणारे हाल थांबविले जावेत. लोढा, रिजेन्सी, रुणवाल या मेगा प्रोजेक्टमुळे या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला क्वारंटाइनसाठी बदलापूर येथे केवळ 15 रुम देण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीत या रुम कमी पडत आहे. लोढा ते बदलापूर हे अंतर 18 किलोमीटर आहे. त्यामुळे रुग्णांना 18 किलोमीटर लांब जावे लागते.
निळजे आरोग्य केंद्र हे सरकारने महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी आमदार पाटील यांनी 24 फेब्रुवारी 2020 रोजी आरोग्य सेवा संचालनालयाच्या सह संचालकांकडे पाठपुरावा केला होता. या बाबतची निर्णय कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तातडीने घेण्यात यावा अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.